पाच जागांवर साथ देण्यास नकार
By Admin | Published: January 16, 2017 04:02 AM2017-01-16T04:02:40+5:302017-01-16T04:02:40+5:30
युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे.
ठाणे : युतीच्या मुद्द्यावर सेना-भाजपमध्ये प्रचंड ओढाताण सुरु असतानाच या युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे. महापालिका निवडणुकीत रिपाइंने २0 जागांची मागणी केली असून, यासाठी वेळप्रसंगी भाजपची साथ सोडून शिवसेनेसोबत घरोबा करण्याची तयारीही या पक्षात सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या २0१२ च्या निवडणुकीला सेना-भाजप एकत्रितरित्या सामोरे गेले होते. आता मात्र निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी युतीमध्ये बेबनाव कायम आहे. २0१२ च्या निवडणुकीत युतीच्या वाट्यातून रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर रिपाइंला विजय मिळाला होता. तरीही गेल्या पाच वर्षांमध्ये पक्ष बळकट झाला असल्याचा दावा करून, रिपाइंने यंदाच्या निवडणुकीत २0 जागांची मागणी केली आहे.
प्रत्यक्षात युतीबाबत अनिश्चितता असल्याने रिपाइंशी अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. युतीचे तळ्यात-मळ्यात असताना रिपाइंनेही पाच जागांवर साथ देण्यास नकार दिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. यंदा मात्र रिपाइंना पाच जागा देऊन उर्वरित पाच जागा भाजपला देण्याचा विचार सुरु आहे. त्याला रिपाइंनी विरोध
दर्शविला आहे. सेना-भाजपची युती झाली नाही, तर २0 जागांची मागणी दोन्ही पक्षांकडे केली जाईल. जो पक्ष जास्त जागा देईल त्यासोबत युती केली जाईल, असे रिपाइं (आ) चे महानगराध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी स्पष्ट केले.
रिपाइंची युती भाजपशी असली तरी, स्थानिक निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याबाबतचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक नेत्यांवर सोडला आहे. त्यामुळे केवळ भाजपचाच झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशी रिपाइंची भूमिका नसल्याचे तायडे यांनी सांगितले. शिवसेनेने पक्षाचा स्वाभिमान राखला, तर निवडणुकीत या पक्षासोबत जाण्याचीही आमची तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सेना-भाजपची युती झाली नाही तर दलित चेहरा कुणाबरोबर असेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. (प्रतिनिधी)