कितीही तणातणी झाली तरी सरकार महायुतीचेच येणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:21 AM2019-10-28T00:21:08+5:302019-10-28T00:21:33+5:30
...तर अमित शहा मार्ग काढतील
कोल्हापूर : दोन सख्ख्या भावांत भांडणे असतात, त्याप्रमाणे आमच्यात थोड्या कुरबुरी असल्या तरी दोघांचाही नीट सन्मान ठेवून सगळे व्यवस्थित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे हे सत्तेचे वाटप नीट करतील. फारच तणाताणी झाली तर पक्षाध्यक्ष अमित शहा मार्ग काढतील. त्यामुळे सरकार महायुतीचेच येणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. याचवेळी ‘कोणावर तरी अन्याय हीच न्यायाची व्याख्या,’ असे संकेतही त्यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण २००८ मध्ये आपण पदवीधर आणि भगवानराव साळुंखे यांनी शिक्षक मतदारसंघातून या बालेकिल्ल्याला हादरा दिला. त्यानंतर २००९ ला कोल्हापुरात युतीला चार, तर सांगलीत तीन जागा मिळाल्या आणि २०१४ ला या जागांत दुप्पट वाढ झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा निवडणुकीत आम्ही मुसंडी मारली; पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडे आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. भाजप, शिवसेनेची पीछेहाट झाल्याची कोल्हेकुई सुरू आहे; पण १९९९ पासूनची राज्यातील दोन्ही कॉँग्रेस आणि युतीची कुंडली पाहिली तर आम्ही कितीतरी पटींनी पुढे आहोत. या निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट गतवेळेपेक्षा खूप चांगला आहे. जागांचे म्हटले तर १०५ अधिक २० अपक्ष आमच्यासोबत आहेत. शिवसेनेचे ५६ अधिक पाच अपक्ष असे १८६ पेक्षा अधिक संख्याबळ होते. त्यामुळे गतवेळेपेक्षा कोठे-कोठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असेही त्यांनी सांगितले.
मग शेखर गोरे यांना ‘एबी’ फॉर्म का दिला?
बंडखोरांवर कारवाईची प्रक्रिया अनुशासन समितीच्या माध्यमातून सुरू आहे; पण यामध्ये केवळ भाजप पदाधिकारीच दोषी नाहीत. जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोरे यांना शिवसेनेने ‘एबी’ फॉर्म दिला. कणकवलीतही तसेच केले. कागलमध्ये दोन्ही घाटगेंना समजावून सांगायला हवे होते. समरजित घाटगे यांना मुंबईला बोलावले, दोन दिवस थांबविले आणि संजय घाटगे यांना ‘एबी’ फॉर्म दिल्याने ते चिडल्याचे पाटील यांनी सांगितले.
मंडलिकांकडून शिवसेना बासनात
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत सोईनुसार भूमिका घेत पक्ष बासनात गुंडाळला. शिवसेनेने याबाबत विचार करावा आणि ज्यांनी शिवसेना वाढविली, त्या संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, राजेश क्षीरसागर यांनी एकत्रित येऊन पक्ष मजबूत करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
कॉँग्रेसला बळ देणारा निर्णय ठाकरे घेणार नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. बाळासाहेबांनी सातत्याने तत्त्वाचे राजकारण केले शिवाय काँग्रेसरूपी अंगाराचा चटका कसा लागतो, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देणारा निर्णय ते घेणार नाहीत. - चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष
मुंडे, राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरू
उदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून, पक्ष त्यांची नीट काळजी घेईल. पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरू असून आमच्याकडे खूप पर्याय असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे पारदर्शक कारभार केला
असून, तेच मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम असल्याचेही पाटील यांनी सांगितले.