सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

By admin | Published: April 5, 2017 06:00 AM2017-04-05T06:00:35+5:302017-04-05T06:00:35+5:30

शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत

Regional backlog of ministers in the Senate! | सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

Next

यदु जोशी,
मुंबई- शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत. मोठ्या संख्येने आमदार निवडून देणारे बरेच
जिल्हे मंत्रिपदाबाबत मात्र कोरडे आहेत.
जयप्रकाश मुंदडा, विजय औटी, संदीपान भुमरे या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मुंदडा हे १९९५ मधील युती सरकारमध्ये मंत्री होते. औटी यांनी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकावत ठेवला आहे.
विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भात शिवसेनेचा मंत्री नाही. पश्चिम विदर्भात संजय राठोड हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री आहेत. मुंबईत शिवसेनेचे तब्बल १४ आमदार आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री नाही. मुंबईतील सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कदम हे मूळ कोकणातील असले तरी ते मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून केवळ विजय शिवतारे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. बाकी जिल्हे कोरडे आहेत. शिवसेनेला सहा आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची झोळी शिवसेना मंत्र्यांबाबत तरी रिकामीच आहे. उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि दादा भुसे हे दोघे राज्यमंत्री आहेत.
मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर असे भाजपाचे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे वजनदार नेते भाजपाकडे आहेत. त्या तुलनेने मराठवाड्यात शिवसेनेचे केवळ एक राज्यमंत्री आहेत.
शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री आमची कामे करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अलीकडेच केलेली आहे. तसेच, विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे काही मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी देतील का याबाबत आमदारांमध्ये उत्सुकता आहे.
>मराठवाड्यात एक राज्यमंत्रिपद
मराठवाडा हा मुंबईनंतर शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र अख्ख्या मराठवाड्यातून एकच म्हणजे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री आहेत. औरंगाबादमध्ये पक्षाचे तीन तर नांदेडमध्ये चार आमदार आहेत पण मंत्रिपद मात्र नाही. शिवसेनेचे प्राबल्य राहिलेल्या कोकणच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रिपद आलेले आहे.
>शिवसेनेचे विद्यमान मंत्री
मुंबई : सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम,
डॉ. दीपक सावंत (कॅबिनेट)
ठाणे : एकनाथ शिंदे (कॅबिनेट)
जळगाव : गुलाबराव पाटील, यवतमाळ - संजय राठोड, जालना - अर्जुन खोतकर, नाशिक - दादा भुसे,
पुणे - विजय शिवतारे, सिंधुदुर्ग - दीपक केसरकर
(सर्व राज्यमंत्री)

Web Title: Regional backlog of ministers in the Senate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.