तक्रार नोंदवण्यास शिक्षकांची पोलिसांकडे रीघ
By admin | Published: April 20, 2017 05:55 AM2017-04-20T05:55:52+5:302017-04-20T05:55:52+5:30
अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार सिंग याने पाच शिक्षकांच्या गटाचीही फसवणूक केली आहे.
ठाणे : अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार सिंग याने पाच शिक्षकांच्या गटाचीही फसवणूक केली आहे. त्यांच्याकडूनही त्याने सहा लाख २० हजार रुपये उकळल्याचे व त्याच्या अटकेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याच्याविरुद्धच्या तक्रारदारांची रीघच वर्तकनगर पोलीस ठाण्याकडे लागली आहे. त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा बुधवारी दाखल झाला. दरम्यान, आधीच्या गुन्ह्यात त्याला ठाणे न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
भिवंडीतील काल्हेर आणि कशेळी भागांत सदनिका बुक केल्यास मोठी सवलत देतो. उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरा, अशी बतावणी करून सरोजकुमारने दीड लाखापासून ते सात लाखांपर्यंत अनेकांकडून रकमा घेतल्या. त्यांना सदनिका किंवा पैसेही न देता नंतर मात्र तो पसार झाला. सावरकरनगर भागातील नयनेश मोदी यांनाही कशेळी भागात सदनिका देण्याचे आमिष दाखवून मार्च २०१२ मध्ये त्यांच्याकडून त्याने सात लाख रुपये घेतले. त्याला १४ एप्रिल २०१७ रोजी सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने अटक केली. याशिवाय, त्याने अनिल गुप्ता यांच्याकडून एक लाख ५१ हजार रुपये, तर शीतलाप्रसाद जयस्वाल यांच्याकडून नऊ लाखांची वन बीएचके सदनिका बुकिंगसाठी २०१३ मध्ये दोन लाख रुपये त्याने घेतले होते. त्याला अटक केल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या आणखी सात ते आठ जणांनी पोलिसांशी संपर्क साधला. दुसरा गुन्हा रेणू सिंग यांच्या गटाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड याबाबतचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)