लग्नाची नोंदणी...पाहावी करून..

By Admin | Published: June 24, 2016 02:20 AM2016-06-24T02:20:32+5:302016-06-24T02:20:32+5:30

लग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा

Registration of marriage ... by seeing. | लग्नाची नोंदणी...पाहावी करून..

लग्नाची नोंदणी...पाहावी करून..

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग/ नम्रता फडणीस,  पुणे
लग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा आणि त्याला कर्मचाऱ्यांची कथीत छुपा पाठिंबा यामुळे दीडशे रुपयांच्या कामासाठी दोन हजार रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विवाह नोंदणी कार्यालयाच्या आवाराला एजंटांचा विळखा असल्याचे दिसून आले. कार्यालयात जाण्याअगोदरच सावज शोधणारे हे एजंट नागरिकांना गाठतात. सरळ पद्धतीने काम होणारच नाही, याची खात्री देतात. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना एजंटांशी व्यवहार करावा लागतो.
नोकरीमध्ये नाव बदलण्यासाठी तसेच पासपोर्टसाठी ‘मॅरेज सर्टिफिकेट’ जरुरीचे असते. धार्मिक पद्धतीने लग्न झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अनेक दाम्पत्यांकडून विवाहाची नोंदणी होत नाही. अचानक गरज पडल्यावर नोंदणीची आठवण होते. वास्तविक महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा आहे. मात्र, याची कल्पनाच नागरिकांना नाही.
‘लोकमत’ प्रतिनिधी विवाह नोंदणी करण्यासाठी विवाह निबंधक कार्यालयात चौकशीसाठी गेल्या असता, थेट गाठ पडली ती एजंटशीच. ‘तुम्ही वकील आहात का?’ असा प्रश्न विचारून एजंटने आधी चाचपणी केली. परंतु, मोकळेपणाने बोलत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी सांगायला सुरुवात केली. अर्ज दाखल करणे, कार्यालयाची वेळ घेणे, अर्जदाराला कळवणे, पती-पत्नी तसेच साक्षीदारांनी दिलेल्या वेळी उपस्थित राहण्यास सांगणे ही सगळी कामे एजंट करताना दिसतात. अर्जदार हेरून त्यांना ‘काय काम आहे’ असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मासा पटकन गळाला लागतो. विवाह नोंदणी कार्यालयाच्या परिसरात सध्या तब्बल ३० एजंट सक्रिय आहेत. याच कामावर उदरनिर्वाह होत असल्याने जास्तीत जास्त अर्जदार मिळण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते.

थेट गेलात तर मारावे लागतील हेलपाटे!
अर्जदार : मला कंपनीच्या कामासाठी परदेशी जाण्याची संधी मिळालीये पण, मॅरेज सर्टिफिक नसल्याने काम अडलंय. काय करता येईल?
एजंट : मॅडम, काहीच अडचण येणार नाही. आवश्यक कागदपत्रे आणून द्या. ३० दिवसांत तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
अर्जदार : पण, तुमच्याकडून प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळू शकेल का?
एजंट : प्रमाणपत्र लवकर हवे असेल, तर तुमच्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘ड’ प्रभागात ही सोय उपलब्ध केली आहे. आमच्याकडे काढले, तरीही ३० दिवस लागतीलच. पुणे आणि पुण्याबाहेर विवाह झाला असेल तरी इथे काम होईल?
अर्जदार : ठीक आहे; तुम्ही तेवढाच कालावधी लावणार, मग एजंटचा फायदा काय?
एजंट : मॅडम, एजंटचा फायदा काय माहितीये का, तुम्हाला केवळ सहीसाठी एकदाच यावे लागेल. मागतील ती कागदपत्रे द्यायची, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सह्या करायच्या, झेरॉक्स काढायच्या, अ‍ॅफिडेव्हिट करायचे...तीस दिवसांनंतर प्रमाणपत्र थेट तुमच्या हातात पडेल. त्यात पैसे एकदम द्यावे लागणार नाहीत. सुरुवातीला हजार आणि काम झाल्यावर हजार. तुमचे हेलपाटेही वाचतील.
अर्जदार : या कामासाठी किती पैसे लागतील?
एजंट : विवाहाचा हंगाम असेल, तर ३००० रुपये आणि आॅफ सिझनला २००० रुपये...
अर्जदार : बापरे, एवढे का? थेट कार्यालयामध्ये यापेक्षा स्वस्तात काम होऊ शकते ना!
एजंट : मॅडम, थोडं समजून घ्या; आतमध्ये गेलात तरी हजार रुपये लागतीलच. शिवाय, सारखे हेलपाटे मारावे लागणार. आम्ही केवळ १००० रुपयेच जास्त घेतो. त्यात, आतमध्येही चिरीमिरी द्यावी लागतेच ना; आमच्या खिशात जेमतेम ५००-६०० रुपये येणार...

एजंटचा इतका मोठ्या प्रमाणावर कार्यालयाच्या बाहेर सुळसुळाट असणे, याला कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही तितकाच छुपा पाठिंबा आहे, हे एजंटशी साधलेल्या संवादातून समोर आले. आम्हाला जेमतेम ८००-१००० रुपये मिळतात, बाकी काय ते तुम्हीच समजून घ्या’, असे एजंटने नकळतपणे सांगितले.

विवाह निबंधक कार्यालयात चौकशी केली असता, विवाह नोंदणीसाठी केवळ १५० रुपये लागतात आणि अगदीच उशीर झाला, तर लग्न झाल्यापासून प्रत्येक महिन्याचा १०० रुपये दंड याप्रमाणे पैसे भरावे लागतात, अशी माहिती मिळाली. इथेही, कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३० दिवसांनंतर नोंदणीची तारीख मिळते. केवळ, कागदपत्रांचा काही गोंधळ असेल, तर कार्यालयाने सांगितलेल्या दिवशी कागदपत्रे घेऊन हजर राहावे लागते. असे असतानाही, एजंटमार्फत विवाह नोंदणी काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.

आता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा अर्ज आणि नोंदणी यासाठी १४० रूपये मोजावे लागतात. याआधी विवाह नोंदणी कधी करावी यासाठी कोणतीही अट नव्हती. आता सहा महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक आहे. अर्जावर विवाह लावलेल्या गुरूजींची सही असणे आवश्यक आहे. वधू-वरांनी लग्नापूर्वीच अर्ज आणून ठेवला असेल, तर तत्काळ सही दिली जाते. मात्र, नसल्यास सहा महिन्यांच्या आत सही घेतली जाते.
- संतोष वझे, गुरूजी

क्षेत्रीय कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. वयाचा दाखला, निवासी पुरावा आदी कागदपत्रे, साक्षीदार यांची जमवाजमव केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी केली जाते. कार्यालयातर्फे ठराविक तारीख दिली जाते. त्यादिवशी उपस्थित राहून नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रमाणपत्र मिळते. ३ महिन्यांच्या आत नोंदणी केल्यास ११० रुपये, १ वर्षाच्या आत २१० रुपये आणि त्यानंतर नोंदणी केल्यास ३१० रुपये शुल्क आकारले जाते.- विवाह निबंधक, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Registration of marriage ... by seeing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.