म्हाडाच्या घरांची नोंदणी आज संपणार
By admin | Published: July 23, 2016 04:40 AM2016-07-23T04:40:16+5:302016-07-23T04:40:16+5:30
म्हाडाच्या सोडतीतील ९७२ घरांसाठी अर्ज करण्याकरिता नोंदणी करता यावी, म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख आहे.
मुंबई : म्हाडाच्या सोडतीतील ९७२ घरांसाठी अर्ज करण्याकरिता नोंदणी करता यावी, म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख आहे. म्हाडाच्या सोडतीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील घरे असून, १० आॅगस्ट रोजी घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
अर्जासाठी २३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर २५ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. आॅनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत आहे आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत २७ जुलैच्या दुपारी ३.३० पर्यंत आहे.
उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत. त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे.
म्हाडाच्या घरांच्या किंमतीत झालेली वाढ आणि उत्पन्न गटात झालेले फेरबदल या प्रमुख घटकांमुळे घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या कमी आहे. आतापर्यंत म्हाडाच्या घरांसाठी एक लाखांहून अर्ज दाखल झाले असून, २३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणीमध्ये वाढ झाल्यास अर्जांत वाढ होईल, अशी शक्यता प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>नोंदणी : १,१८,२९८
अर्जदार : १,३५, ७३८
अनामत रक्कम
भरणाऱ्यांची संख्या : ६१,३५३