राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:04 AM2020-11-26T11:04:03+5:302020-11-26T11:09:38+5:30
पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शासनाने सर्वसामान्य नागरिकांची बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी "रेरा" कायदा लागू केला. परंतु दुय्यम निबंधकांना हाताशी धरून रेरा कायद्याचे उल्लंघन करून संपूर्ण राज्यात सर्रास दस्त नोंदणी सुरू आहे. यामध्ये हे प्रमाण पुणे जिल्ह्यात त्यातही शहरामध्ये सर्वाधिक असल्याच्या अनेक तक्रारी थेट शासनाकडे गेल्या आहेत. यामुळेच राज्य शासनाने पुण्यातील रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केलेल्या सर्व व्यवहारांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक नियुक्त केले आहे. या चौकशी पथकांने तपासणी करून 1 डिसेंबरच्या आता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. पुण्यात बाणेर, हडपसरसह पीएमआरडीएच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत परवानगी असलेल्या, रेरा कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि गुंठेवारीला बंदी असताना सरास बोगस दस्त नोंदणी केली असल्याची तक्रार शासनाला प्राप्त झाली असून, त्यानुसार ही चौकशी समिती नियुक्त करण्यात येत असल्यास शासनाने थेट आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
शासनाने काढलेल्या आदेशात " रेरा कायद्याचे उल्लंघन करुन दस्त नोंदणी झाल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक, हवेली क्र.३ या कार्यालयासोबतच पुणे शहरातील अन्य दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची कार्यवाही पार पाडली जाते किंवा कसे? याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्याकरीता तपासणी पथक नियुक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्याकरीता आणि उक्त तपासणी पथकाचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यां कार्यालयामार्फत शासनास दि.०१ डिसेंबर, २०२० पूर्वी सादर करावा असे स्पष्ट केले आहे.
------
ही आहे चौकशी समिती
- गोविंद कराड, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, लातूर विभाग,
- भरत गरुड. प्रभारी, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (मुख्यालय),
- विजय भालेराय, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव
- उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर