गरजेपोटीची बांधकामे नियमित करा
By admin | Published: August 24, 2016 02:24 AM2016-08-24T02:24:18+5:302016-08-24T02:24:18+5:30
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको व महापालिकेने ही बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्याकडे केली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बेलापूर येथील सिडको गेस्ट हाऊस येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री शिंदे यांच्यासह खासदार विचारे व आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. राजेश पाटील यांनी या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.
सिडकोच्या चुकीमुळे आज ही परिस्थिती उद्भली आहे. चार दशके झाली तरी गावांचे सीमांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे गावठाण विस्तार केला गेला नाही. शहर विकसित करताना गावांचे नियोजन झाले नाही. साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेत मोठ्याप्रमाणात दिरंगाई करण्यात आली. याचा परिणाम म्हणून प्रकल्पग्रस्तांनी वाढत्या कुटुंबांची गरज लक्षात घेवून मूळ जागेवर गरजेपोटी बांधकामे केली. ही बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही बांधकामे नियमित करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी डॉ. राजेश पाटील यांनी यावेळी केली.
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न गंभीर व तितकाच जिव्हाळ्याचा आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून यासंदर्भातील गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, प्रकल्पग्रस्तांचे नेते मोरेश्वर पाटील, विठ्ठल मोरे व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)