मिठागरातील भूमिपुत्रांचे पुनर्वसन करा!
By admin | Published: May 18, 2016 03:56 AM2016-05-18T03:56:12+5:302016-05-18T03:56:12+5:30
अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला
भार्इंदर : मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील गावदेवीनगर या मिठागराच्या भागात अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला आहे. या सर्व भूमिपुत्रांचे पुनर्वसन पालिका जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत त्यांची घरे तोडू नका, अशी मागणी माजी आ. विवेक पंडित यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
हवालदिल झालेल्या या भूमिपुत्रांनी हक्काचे घर मिळावे, यासाठी पंडित यांच्याकडे धाव घेतली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी ते पालिकेत आले होते. गावदेवीनगर या मिठागराच्या जागेत वसलेल्या भूमिपुत्रांची घरे मिठागरामुळे सीआरझेडबाधित आहेत. या भूमिपुत्रांना घरांचा विकास न करताच झोपडीवजा घरांत वास्तव्य करावे लागत आहे. येथील सुमारे २५० एकर मिठागरांची जागा एका बड्या बिल्डरला आर्थिक तडजोडीतून देण्यात आल्याने हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मिठागर सीआरझेडबाधित असतानाही पालिका येथे २००० मधील मंजूर विकास आराखड्यानुसार राजकीय दबावातून विकासकाचे हित जोपासण्यासाठी रस्ता तयार करण्याचा घाट घालत आहे. त्यात ३६ भूमिपुत्रांची घरे आणि दुकाने बाधित होत असल्याने त्यांना पालिकेने स्थलांतरित करण्याचे ठरवले आहे. कनाकिया येथे विकसित केलेल्या इमारतींत त्या भूमिपुत्रांना पालिका बेघरांसाठी घर या योजनेंतर्गत घरे देणार आहे. बाधितांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यांना घरे देण्याचे पालिकेने मान्य केले असले तरी २ घरे, ६ दुकाने अपात्र ठरवली आहेत. (प्रतिनिधी)
>विवेक पंडीत यांची मागणी
दुकानदारांकडे २००० पूर्वीचे गुमास्ता लायसन्स नसल्याचा दावा करून त्यांना अपात्र ठरवल्याने ते हवालदिल झाले आहेत. या सर्व बाधितांना केवळ निर्धारित कालावधीतील कागदपत्रे नसल्याचे कारण देत वारसा हक्काचा दावा अमान्य करणे योग्य नाही. अनेक वर्षांपासूनचे वास्तव्य असलेली कोणतीही कागदपत्रे वास्तव्याचा ठोस पुरावा मानून सर्व भूमिपुत्रांना कायमस्वरूपी घरे दिल्यानंतरच त्यांची घरे तोडण्यात यावीत.