हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:41 PM2017-09-26T20:41:54+5:302017-09-26T20:42:57+5:30

मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

Rehabilitated stalls have been rebuilt by villagers, villagers' outbreak, angry over sudden campaign | हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

Next

आंबोली - येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  तसेच रात्री अचानक स्टॉल हटविण्याच्या कृतीबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आंबोलीतील मुख्य धबधब्यावर गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी स्टॉल उभारले आहेत. पण या स्टॉलधारकांना चार दिवसांपूर्वी अचानक वनविभागाने नोटिसा दिल्या. तर सोमवारी रात्रीच्या सुमारास हे स्टॉल काढून टाकण्यात आले. सुरुवातीला वनविभागाने स्टॉल काढून टाकण्याचे श्रेय घेतले खरे; पण स्टॉलधारकांचा उद्रेक बघून आपण त्यातले नाहीच असा पवित्रा वनविभागाने दिवसभर घेतला होता. स्टॉलधारकांनी स्टॉलसाठी लावलेले बांबूही दरीत फेकून देण्यात आले होते. वनविभागाने रितसर कारवाई करायची सोडून रात्रीच्या वेळी कारवाई केल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सोमवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर आंबोलीतील ग्रामस्थ केशव जाधव यांनी उपोषण केले होते. 
त्यानंतर वनविभागाने हा निर्णय घेतला होता. हे स्टॉल अनधिकृत आहेत. त्यामुळे स्टॉल हटविणारच, असा पवित्रा वनविभागाने घेतला होता. स्टॉलधारक आपले स्टॉल रात्री आठच्या सुमारास बंद करून जातात. हीच संधी साधत हे स्टॉल हटविले होते. पण मंगळवारी सकाळी स्टॉलधारकांना हे समजले. आपले स्टॉल हटविल्यामुळे स्टॉलधारक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली होती. मात्र आचारसंहिता असल्याने सर्व स्टॉलधारक आपल्या आंदोलनाची दिशा ठरवित होते. त्याचवेळी स्टॉलधारकांनी आक्रमक होत पुन्हा स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला. कोण आपले स्टॉल हटवते ते बघूया, असे म्हणत हे स्टॉल उभारले. मात्र उशिरापर्यंत वनविभागाचे कोणीही अधिकारी तेथे फिरकले नाहीत.
दरम्यान, सोमवारी रात्री स्टॉल हटविले आणि मंगळवारी सायंकाळी स्टॉलधारकांनी पुन्हा स्टॉल उभारल्याने सध्या तरी हा वाद शमला असला तरी पुन्हा केव्हाही उभा राहू शकतो, असे मत आंबोलीतील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच शांत आंबोली नको त्या कारणांनी अशांत बनविली जात असल्याचा आरोपही स्टॉलधारक करीत आहेत.
आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होतेय
सध्या आंबोलीच्या पर्यटनाची या ना त्या कारणाने वनविभाग बदनामी करीत आहे. कधी धबधबा कोणाचा यावरून वाद, तर कधी स्टॉलवरून वाद. यापूर्वी कधीही अशाप्रकारे वाद नव्हते. पण आता हे नव्याने आंबोलीत वाद उभे राहत आहेत. त्यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी करणा-या अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आंबोलीतील स्टॉल हटविण्याचे काम आंबोली वनविभागातील कर्मचा-यांकडून काही वरिष्ठ अधिका-यांनी करून घेतले. पण मंगळवारी ही कारवाई अंगलट येणार असे वाटल्याने अखेर सर्व स्टॉल उभारण्यास परवानगी दिली. तसेच याबाबत सर्वच अधिका-यांनी कानावर हात घेतले. अधिकारी कोणाचे दूरध्वनीही घेण्यास तयार नव्हते.
कारवाई करणार
सोमवारी रात्री जे स्टॉल हटविले ते वनविभागानेच हटविले आहेत. हे सर्व स्टॉल अनधिकृत होते व वनविभागाच्या जागेत होते. पर्यटनस्थळावर येणा-यांना पार्किंगचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हे स्टॉल वनविभागाने हटविले आहेत आणि जर पुन्हा या ठिकाणी स्टॉल उभारले गेले असतील तर नियमात राहून कारवाई करण्यात येणार आहे.
- संजय कदम, वनक्षेत्रपाल, आंबोली

Web Title: Rehabilitated stalls have been rebuilt by villagers, villagers' outbreak, angry over sudden campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.