कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना होणार

By admin | Published: April 12, 2015 01:05 AM2015-04-12T01:05:30+5:302015-04-12T01:05:30+5:30

शिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत.

The rehabilitation of the Ambabai idol of Kolhapur will be done again | कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना होणार

कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना होणार

Next

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूर
शिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. देवीचा हा त्रिशताब्दी उत्सव वर्षभर भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा, यासाठी ‘श्री अंबाबाई मूर्ती पुन:प्रतिष्ठापना त्रिशताब्दी महोत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र याला शासनाकडून भक्कम आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.
अंबाबाईची मूर्ती मंदिरात पुन:प्रतिष्ठापित केली, त्या घटनेला २६ सप्टेंबर २०१५ रोजी ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कोल्हापुरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव नियोजनबद्ध होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, धार्मिक संस्था, श्रीपूजक आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. याअंतर्गत इतिहास परिषद, यज्ञ-होमहवन, भजन-कीर्तन महोत्सव तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नांदेड येथील ‘गुरुदा गद्दी’ला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भरघोस निधी मिळून या शहराचा कायापालट करण्यात आला. तुळजापूर, पंढरपूरसह अक्कलकोटसारख्या लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांचा विकास झपाट्याने झाला; पण गेली चार वर्षे अंबाबाई मंदिराचा विकास कागदोपत्री आराखड्यांपुढे गेलाच नाही. मात्र मंदिराची प्राचीन महती आणि ३०० वर्षे पूर्तीचा संदर्भ देऊन भरघोस निधी आणण्यासाठी पुढाकाराची गरज आहे. हा त्रिशताब्दी सोहळा आणि मंदिराचा विकास केला, तरच या क्षेत्राचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगभरात नावलौकिक पोहोचणार आहे.

आदिलशाहीच्या काळात मंदिरावरील आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी १२ ते १६व्या शतकाच्या दरम्यान ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. ही मूर्ती पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावी, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना अंबाबाईने दिला. त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना सांगितली. शंभुराजेंनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या पुन:प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७, राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी मूर्तीची मंदिरात पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली. ग.ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवते, मूर्तिविज्ञान, करवीर सरदारांच्या कैफियती या ग्रंथांमध्ये हा उल्लेख आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही आदिशक्तीचे स्वरूप आहे. ती शाक्त सांप्रदायातील देवता आहे. प्रत्येक राजवटीच्या काळात मंदिरात सुधारणा होत आताचे अंबाबाई मंदिराचे बदललेले स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. ‘जो लवाजमा आम्हाला आहे, त्यापेक्षा काकणभर सरस करून देवीला द्या,’ अशी आज्ञापत्रे शाहू महाराजांनी काढली व रोषण नाईक, भालदार-चोपदार, सरदार, तोफेकरी, घोडेस्वार असा लवाजमा देवीच्या चरणी वाहिला.

Web Title: The rehabilitation of the Ambabai idol of Kolhapur will be done again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.