विक्रोळीतील हनुमान नगरचा पुनर्विकास एसआरएकडूनच करा!
By admin | Published: November 5, 2016 04:51 AM2016-11-05T04:51:09+5:302016-11-05T04:51:09+5:30
हनुमान नगर पार्क साइटचा पुनर्विकास एसआरएकडून करा, असे पत्र म्हाडा प्रशासनाने येथील अर्जदार देवदर्शन सहकारी संस्थेला पाठविले आहे.
मुंबई : विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमान नगर पार्क साइटचा पुनर्विकास एसआरएकडून करा, असे पत्र म्हाडा प्रशासनाने येथील अर्जदार देवदर्शन सहकारी संस्थेला पाठविले आहे. या आधी संबंधित जागेचा पुनर्विकास म्हाडाने करण्याची विनंती, संस्थेने केली होती. मात्र त्याला नकार देत म्हाडाने संस्थेला एसआरएमार्फत पुनर्विकास करण्याची सूचना केली आहे.
यासंदर्भात म्हाडाच्या कुर्ला विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी हनुमाननगर विकास मंडळाला पत्रही पाठविले आहे. त्यात म्हाडाने म्हटल्याप्रमाणे ३३ (५)बाबत शासन नियमानुसार म्हाडाच्या अस्तित्वात असलेल्या मंजूर अभिन्यासातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट यांच्या मूळ वसाहतीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडा प्रशासन करते. सोबतच म्हाडा जमिनीवरील मोकळ्या भूखंडावरील विकास करता येतो. मात्र संबंधित संस्था ही गणनाकृत किंवा ओळखपत्रधारक झोपडपट्टीमध्ये गणली जाते. त्यामुळे शासन आदेशानुसार या संस्थेचा पुनर्विकास हा ३३(१०) अंतर्गत होऊ शकतो. त्यास ३३(५) ही नियमावली लागू होणार नाही.
दरम्यान, येथील हजारो रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हनुमान नगर विकास मंडळामार्फत देवदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) आणि इतर १४ संस्थांचा पुनर्विकास म्हाडाने करण्याची विनंती केली होती. मात्र म्हाडाने दिलेल्या पत्रामुळे रहिवाशांना एसआरएचा मार्ग निवडावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)