‘गांधी हत्येचा पुन्हा तपास केल्यास नवे तथ्य समोर येईल’, तुषार गांधी यांचे महत्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:52 AM2022-08-22T08:52:09+5:302022-08-22T08:53:09+5:30
पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याने महात्मा गांधी यांचा खून केला, असा खोटा प्रचार केला जात आहे.
कोल्हापूर :
पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याने महात्मा गांधी यांचा खून केला, असा खोटा प्रचार केला जात आहे. या हत्या प्रकरणाची कागदपत्रे पुन्हा तपासल्यास नवे तथ्य समोर येईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी रविवारी व्यक्त केले.
कोल्हापूर येथे जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी तुषार गांधी व लेखक अशोककुमार पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तुषार गांधी म्हणाले, ‘महात्मा गांधी यांची हत्या जरी नथुराम गोडसे यांनी केली असली, तरी यामागे वेगळ्या शक्ती आहेत. यासाठी या खटल्यातील कागदपत्रांचा नव्याने अभ्यास झाला पाहिजे. गांधींच्यानंतरदेखील विचारवंतांना मारण्याची शृंखला सुरूच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश हे याचाच भाग आहेत. आध्यात्मिक आणि राजकीय धर्म असे दोन भाग आहेत. आध्यात्मिक धर्म नेहमीच चांगला असतो त्याला काहीजण स्वार्थासाठी राजकीय स्वरूप देतात.
अशोककुमार पांडे म्हणाले, महात्मा गांधी यांची हत्या जरी एका क्षणात झाली असली तरी त्यामागे खूप मोठे षङ्यंत्र होते. पोलीस तपासांतदेखील अनेक त्रुटी असल्याचे कपूर कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.