तब्बल ९ कोटींचे पॅकेज नाकारत घेतली दीक्षा; संयमश्रीजींची प्रेरणादायी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:57 AM2022-07-04T07:57:55+5:302022-07-04T07:58:06+5:30
संयमश्रीजी महाराज यांची प्रेरणादायी कहाणी, मी बरोबर आहे. माझेच खरे आहे. इतरांच्या मतांना माझ्या लेखी काहीच किंमत नाही. जगातल्या अशांततेच्या मुळाशी याच गोष्टी कारणीभूत आहेत.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जि. जळगाव) : कॅलिफोर्निया येथील कंपनीने व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीचा जॉब ऑफर करताना वार्षिक ९ कोटी रुपयांचे घसघशीत पॅकेज दिले होते. मात्र, यावर पाणी सोडत संयमश्रीजी म. सा. यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी दीक्षा घेतली आणि धर्मप्रसारासाठी वयाच्या २२ व्या वर्षी स्वतःला झोकून दिले आहे. राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, हे विशेष.
श्री श्वेतांबर जैन संघाच्या वतीने येथील अरिहंत मंगल कार्यालयात १३ पासून चातुर्मासानिमित्त संत्सग सोहळा होत आहे. त्यासाठी संयमश्रीजी म. सा. यांचे येथे शनिवारी आगमन झाले. विशेष म्हणजे, यावर्षी हा सोहळा प्रथमच जैन समाजासह इतर समाज घटकांसाठीही आयोजित करण्यात आला आहे. संयमश्रीजी म. सा. यांनी दीक्षा घेण्याअगोदरचा प्रवासपट ‘लोकमत’शी बोलताना उलगडला. त्यांना भाऊ आणि बहीण आहेत. त्या सुखवस्तू परिवारातील आहेत. वादविवाद, गायन, संभाषण, क्रीडा आदी प्रकारांमध्ये त्यांनी आजवर उल्लेखनीय यश मिळविले आहे.
संयमश्रीजी म. सा. म्हणाल्या की, आठ वर्षं परिवाराशी आणि स्वतःच्या मनाशी संघर्ष करून अखेरीस दीक्षा घेतली. एकदा तुम्ही तुमचे ध्येय निवडा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. त्यामुळे तुमच्यात संघर्षाची प्रेरणा निर्माण होते. सन २०१३ पासून आपला दीक्षा घेण्याचा संघर्ष सुरू झाला. यासाठी परिवाराचे मनपरिवर्तन करण्यासाठी आठ वर्षं लागली. माझी मनाची तयारी मात्र अगोदरच झाली होती. यासाठी काकांचे मिळालेले प्रोत्साहन मोलाचे ठरले. संतांचा संपर्क, जैन तत्त्वज्ञान यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. शांतता, समाधान शोधण्याऐवजी ते मानण्यावर अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अक्षयश्री अ.खा., संसिध्दीजी म.सा., विभवश्री म.सा. यादेखील उपस्थित होत्या.
यशस्वी जीवनाची ‘ही’ त्रिसूत्री आहे गुरुकिल्ली
मोबाइल युगात संवादही ठेवा. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घाला. साधू-संत यांचा संत्सग, सद्गुरुंचा संपर्क या गोष्टी अंतिमतः समाधानासह शांततेकडेच घेऊन जातात. कष्ट करण्याची तयारी, थोरा-मोठ्यांचा आदर आणि सकारात्मकता ही त्रिसूत्री यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. - संयमश्रीजी महाराज म.सा.