हॉटेल, लॉज, मनोरंजनासाठी महसूल विभागाचा परवाना रद्द
By admin | Published: January 7, 2016 12:04 AM2016-01-07T00:04:39+5:302016-01-07T00:51:47+5:30
महसूलचे नियंत्रण संपुष्टात : शासनाची नवीन नियमावली
मिरज : हॉटेल, धाबे, लॉजसह मनोरंजन कार्यक्रम व नाट्यगृहासाठी लागणारा महसूल विभागाचा परवाना नवीन वर्षापासून शासनाने रद्द केला आहे. हॉटेल, लॉज व मनोरंजन व्यवसायातील महसूल विभागाचे नियंत्रण रद्द करण्यात आले असून, नवीन नियमावली तयार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश गृह विभागाच्या नवीन परिपत्रकात देण्यात आले आहेत.
हॉटेल, लॉज सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र व परवाना, प्रांताधिकाऱ्यांकडून लॉजिंग व्यवसायासाठी आदरातिथ्य परवाना घ्यावा लागतो. महसूल विभागाकडून हे परवाने मिळविण्याची प्रक्रिया किचकट आहे. खाद्यगृह व लॉजिंग परवान्यासाठी वाणिज्य वापराची अट असल्याने राज्यात हजारो हॉटेल्स व ढाबे विनापरवाना सुरू आहेत. मनोरंजन कार्यक्रम किंवा नाट्यगृह सुरू करण्यासाठी महसूल विभागाकडून सार्वजनिक मनोरंजन परवाना, सादरीकरण परवाना घ्यावा लागत होता. विनापरवाना हॉटेल व धाबे व लॉजवर दंडात्मक कारवाईचे अधिकार होते. दि. २२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गृह सचिवांनी परिपत्रक काढून हॉटेल व मनोरंजन व्यवसायासाठी महसूल विभागामार्फत परवाने घेण्याची अट रद्द केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे विनापरवाना असलेली हॉटेल्स व धाबे आता स्थानिक स्वराज्य संस्था व अन्न औषध विभागाच्या मजूरीनंतर अधिकृत ठरणार आहेत.
यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था व अन्न औषध विभागाचा परवाना असल्यास हॉटेल लॉज व्यवसाय करता येणार आहे. मनोरंजन व्यवसायालाही महसूल विभागाच्या परवान्याची आवश्यकता असणार नाही. मात्र डान्सबारचा परवाना देताना सादरीकरण परवाना आवश्यक ठरणार आहे. (वार्ताहर)
पोलिसांची झाली पंचाईत
यापुढे मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल लॉज व मनोरंजन व्यवसायासाठी नवीन नियम तयार करावयाचे आहेत. महसूल विभागाचा परवाना नसलेल्या हॉटेल व लॉजेसवर पोलिसांना कारवाईचे अधिकार होते. मात्र परवान्याची अट रद्द झाल्याने महसूल परवान्यासाठी पोलिसांना कारवाईची आवश्यकता राहिलेली नाही.