गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वितेवर पुन्हा मोहोर

By admin | Published: July 6, 2017 03:27 AM2017-07-06T03:27:36+5:302017-07-06T03:27:36+5:30

पुण्यात झालेल्या देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणावर यशस्वितेची आणखी एक मोहोर उमटली आहे. दोन्ही महिलांना नैसर्गिकरीत्या मासिक पाळी

Rejuvenate the success of uterine transplantation | गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वितेवर पुन्हा मोहोर

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वितेवर पुन्हा मोहोर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात झालेल्या देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणावर यशस्वितेची आणखी एक मोहोर उमटली आहे. दोन्ही महिलांना नैसर्गिकरीत्या मासिक पाळी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्यारोपण केलेले गर्भाशय नैसर्गिकरीत्या काम करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनंतर देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून २०५ महिलांनी शस्त्रक्रियांसाठी नावनोंदणी केली आहे.
पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त गर्भाशय प्रत्यारोपणाचे विभागाचे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. पुणतांबेकर म्हणाले, की जन्मत: गर्भाशय नसलेल्या स्त्रीचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहिली तरी तिच्या डोळ््यात
पाणी येते. यशस्वी गर्भाशय
प्रत्यारोपणामुळे मातृत्वाच्या सुखाबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. या शस्त्रक्रियेसाठी २० लाखांच्या घरात खर्च येतो. गरजू रुग्णांना हे उपचार दोन-अडीच लाखांत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक संशोधनाची चर्चा, चिकित्सा व्हायला हवी.
चिकित्सा अथवा विरोधातूनच विज्ञानाची प्रगती होते. त्यातूनच मार्गदर्शक तत्त्वे तयार होऊ शकतात. प्रत्यारोपणाच्या बाबतीत काही कायदेशीर आणि नैतिक बाबी आहेत, त्यावरही लवकरच तोडगा निघेल.

आम्ही तीन वर्षांपूर्वी गर्भाशय प्रत्यारोपणाचे स्वप्न पाहिले. कालमर्यादा असलेल्या स्वप्न हेच आमचे ध्येय बनले, असे सांगून डॉ. पुणतांबेकर म्हणाले, ‘‘प्रत्यारोपणाचा प्रयोग हा एक दिवसाचा विचार नसून, त्यामागे खूप कष्ट दडलेले आहेत. मी, पंकज कुलकर्णी आणि मिलिंद तेलंग यांनी तीन आठवडे स्वीडनला जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात परतून शस्त्रक्रियेच्या दृष्टीने तयारी आणि प्रयत्न केले. आपल्याला राजकीय लोकांना दोष देण्याची
सवय लागली आहे. मात्र, प्रत्यारोपणाची तयारी, परवानगी यासाठी सरकारने विशिष्ट दिशेने काम केले. सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अंगात दिव्य संचारल्याप्रमाणे काम पूर्णत्वाला नेले.’’

प्रत्यारोपण, अवयवदान हा संजीवनी मंत्र : मुक्ता टिळक

महिला, तरुणींना निसर्गत:च मातृत्वाची ओढ असते. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून निसर्गाने अन्याय केलेला विज्ञानाच्या मदतीने दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न गॅलॅक्सी हॉस्पिटलने केला आहे. प्रत्यारोपण, अवयवदान हा संजीवनी मंत्र ठरत
आहे, असे गौरवोद्गार महापौर मुक्ता टिळक यांनी काढले.
गर्भाशय प्रत्यारोपण बाह्यरुग्ण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. सीमा पुणतांबेकर, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी
उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, ही केवळ झेप नव्हे, तर मोठी
उडी आहे. गॅलॅक्सी हॉस्पिटलच्या रुपाने पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे केंद्र निर्माण झाले आहे.’’
या वेळी डॉ. संजीव जाधव, डॉ. उदय फडके, डॉ. सुहास हरदास यांच्यासह गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. मिलिंद तेलंग यांनी
सूत्रसंचालन केले. डॉ. पंकज कुलकर्णी यांनी आभार मानले.

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनी पुण्यात आणि पर्यायाने भारतात इतिहास घडला आहे. प्रत्यारोपण आणि अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होण्याची गरज आहे. प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया हे आजवरच्या संशोधनाचे फलित आहे. यानिमित्ताने अनेक महिलांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. हजारो कुटुंबांना मिळालेली संजीवनी, यापेक्षा वेगळे दान काय असू शकते? महानगरपालिकेकडून अशा उपक्रमांचे स्वागत केले जाईल.
मुक्ता टिळक, महापौर

स्त्रीने अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:चा ठसा उमटवला असला तरी तिचे आयुष्य मुलांभोवती फिरते. डॉक्टरांना देवाची उपमा का दिली जाते, हे डॉ. पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने सिद्ध केले आहे. अशा कौतुकास्पद उपक्रमांना सरकारकडून नेहमीच पाठबळ दिले जाईल.
- मेधा कुलकर्णी, आमदार

Web Title: Rejuvenate the success of uterine transplantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.