पुनर्वसूच्या पावसाने राज्याला तारले
By admin | Published: July 15, 2017 02:34 AM2017-07-15T02:34:25+5:302017-07-15T02:34:25+5:30
गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. मात्र, सध्या पुनर्वसू नक्षत्र चालू असून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकरी बांधव ‘तरणा पाऊस’ म्हणतात आणि उशिरा का होईना, पुनर्वसू नक्षत्रातच पावसाचे पुनरागमन झाल्याने या ‘तरण्या’ पावसाने सर्वांनाच तारले आहे. १९ जुलैपर्यंत सूर्य पुनर्वसू नक्षत्रात राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
शेतकऱ्यांनी प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला गमतीशीर नावे दिलेली आहेत. त्याविषयी सोमण यांनी सांगितले, १९ जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करील. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. या काळात पाऊस संथ; पण सतत पडत असतो, म्हणून हे नाव पावसाला देण्यात आले असावे. २ आॅगस्ट रोजी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रातील पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. १६ आॅगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात. ३० आॅगस्ट रोजी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात पाऊस अगदी आज्ञाधारकासारखा पडत असल्याने या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. त्यानंतर, १३ सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करील. या नक्षत्रकाळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त असल्याने त्याला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात. २६ सप्टेंबर रोजी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे या नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ असे म्हणतात. १० आॅक्टोबर रोजी सूर्य चित्रा व २३ आॅक्टोबर रोजी स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर, मात्र पावसाळ्याचा मोसम समाप्त होतो.
२२ जुलै रोजी सकाळी ११.२० वाजता ४.६२ मीटर उंचीची भरती येणार आहे. २३ जुलै दुपारी १२.०६ वाजता ४.८१ मीटर, २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता ४.८९ मीटर, २५ जुलै रोजी दुपारी १.३२ वाजता ४.८७ मीटर, २६ जुलै रोजी दुपारी २.१२ वाजता ४.७५ मीटर आणि २७ जुलै रोजी दुपारी २.५४ वाजता ४.५४ मीटर उंचीची भरती येणार आहे. ही लाटांची नव्हे तर भरतीच्या पाण्याची उंची असते, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.