करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलती
By admin | Published: February 16, 2017 06:48 PM2017-02-16T18:48:05+5:302017-02-16T18:48:05+5:30
करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलती
करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलती
करमाळा : आॅनलाईन लोकमत सोलापूर
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भावकीचे राजकारण रंगले असून पाहुणे-रावळे, नाती-गोती व सग्या-सोयऱ्यांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या असून आता मतदान फिक्स करताना नात्या-गोत्याची ओळख निघू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या कोर्टी गटातून झोळ कुटुंबीयातील दोन सुना एकमेकांविरुद्ध लढत देत आहेत. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ बागल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून तर आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ यांच्या पत्नी स्वाती झोळ या संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीतून एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. तसाच प्रकार जेऊर पंचायत समिती गणातून चिखलठाण येथील सरडे कुटुंबीयात झाला आहे. आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे हे महाआघाडीतून उभे असून पै. दत्तात्रय सरडे शिवसेना तर अजिनाथ सरडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. सरडे यांच्यात भावकीचे राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने रंगले आहे.
-----------------------
झोळ व भोसले घराण्यात भावकी कल्लोळ...
कोर्टी जि. प. गटातून शिवसेना व काँग्रेस आय युतीतून निवडणूक रिंगणात असलेल्या सवितादेवी राजेभासले यांचे सख्ख्ये पुतणे नितीनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माया झोळ यांच्या बाजूने व चुलती सवितादेवी राजेभोसले यांच्या विरोधात प्रचार कार्य करीत असून तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माया झोळ यांचे दीर आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ शिवसेनेच्या उमेदवार सवितादेवी राजेभोसले यांच्या बाजूने व भावजय माया झोळ यांच्या विरोधात प्रचार कार्यात सक्रिय आहेत.
--------------------
करमाळा तालुक्याच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. स्व. नामदेवराव जगताप यांची तिसरी पिढी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांच्या रूपाने राजकारणात सक्रिय आहे. स्व. दिगंबरराव बागल यांची दुसरी पिढी रश्मी बागल व दिग्विजय बागल तालुक्याच्या राजकारणात आहेत. आदिनाथचे संस्थापक अध्यक्ष गोविंदबापू पाटील यांचे चिरंजीव नारायण पाटील आमदार आहेत. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जगताप, बागल घराण्यातील कोणीही वारस निवडणूक लढवित नसले तरी नात्या-गोत्यातील व पाहुणे-रावळे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत.
--------------------
विद्यमान आ. नारायण पाटील यांच्या पाटील कुटुंबातील चुलत भाऊ डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील कुंभेज गणातून शिवसेना पक्षाकडून उभे आहेत. माजी आ. जयवंतराव जगताप यांचे सोयरे स्व. सुभाष सावंत यांचे चिरंजीव अॅड. राहुल सावंत पांडे गणातून जगतापांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत.
---------------------
पाहुण्या-रावळ्यांचे मतदान
करमाळा तालुक्यात सर्वाधिक मतदार मराठा समाजाचा असून त्या खालोखाल धनगर समाज आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी अथवा साखर कारखाने कोणतीही निवडणूक असो मतदान करताना उमेदवार व समर्थक कार्यकर्ते सर्वात अगोदर नाती-गोती, पाहुणे-रावळे व सगे-सोयरे यांच्याकडे जाऊन मत मागतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही नात्या-गोत्याचे व पाव्हण्या-रावळ्याचे राजकारण सुरू झाले आहे.