नात्यातील सुरेल संवादासाठी... अनुरुप जोडीदाराच्या निवडीसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:04 PM2019-01-12T14:04:41+5:302019-01-12T14:28:03+5:30
विवाहाच्या उंबरठ्यावर उभे असताना मी विवाह करण्यास योग्य आहे का? ही योग्यता शारीरिक, भावनिक, वैचारिक आणि व्यावहारिक या चार पातळ्यांवर तपासून पाहिली पाहिजे.
- अविनाश पाटील
लातूर येथे १३ जानेवारी रोजी ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प राज्य परिषदेच्या उद्घाटनानिमित्त’ हा लेख...
सध्या सोशल मीडियावर मुलींच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, मुली कशा अविचारी अपेक्षा ठेवतात, त्यामुळे त्यांचे लग्नाचे वय जास्त वाढत आहे, अशा एकतर्फी मांडणीचे मेसेज फिरत असतात. तसेच लग्नानंतर मुले बायकोच्या सांगण्याने कशी बिघडतात, आई-वडिलांना कशी विसरतात, मुलीच्या आईच्या हस्तक्षेपाने संसार कसे मोडतात, असे मेसेजही पसरवले जात असतात.
वैवाहिक जीवन, त्यातून येणारे नातेसंबंध यामध्ये समस्या निर्माण होतात, परंतु प्रत्येकाच्या बाबतीत हे घडते का? कारणे फक्त मुलींशीच निगडीत आहेत का? याअनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवक-युवतींसोबत काम केल्यावर जाणवले की, जोडीदाराच्या निवड प्रक्रियेत फारसा संवाद आणि मोकळेपणा नसतो.
जोडीदाराचे स्थान आयुष्यात महत्त्वाचे असताना कधी कोणाचे तरी मन राखण्यासाठी, कधी आकर्षणातून, दबावातून निर्णय घेतले जातात. पालकही मुलांच्या अपेक्षा, स्वप्न समजून घेऊन निर्णय करतातच असे नाही, हे सर्व टाळण्यासाठी एका व्यापक संवादाची गरज आहे. त्यातूनच जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम पुढे आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत होती, सहकार्य करीत होती. हे करताना अनेकदा जाणवत होते की, मुलांनी घेतलेले निर्णय सर्वांगीण विचार करून घेतलेले असतातच असे नाही. त्यामुळे निवडीसंदर्भात विचार करायला लावणे, दिशा देणे आवश्यक होते.
व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून लग्नाळू मुले-मुली यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी प्रशिक्षणे घेतली. मुलगा-मुलगी व पालकांसाठी संवादशाळाही घेतली. त्याचाच एक भाग म्हणून १२ जानेवारी अर्थात् राष्ट्रीय युवा दिनापासून १४ फेब्रुवारीपर्यंत जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे उद्घाटन १३ जानेवारी रोजी लातूर येथे होत आहे. त्यानिमित्त जोडीदार निवडीच्या निकषाची चर्चा केली आहे.
जोडीदार निवडताना आपल्या आवडी-निवडींचा विचार करणारे पालक असतील तर निवड सोपी होते. प्रेम विवाहात समोरील व्यक्तीच्या काही गोष्टींचा प्रभाव एवढा असतो की अनेक महत्त्वाच्या आवश्यक असणा-या गोष्टींकडे डोळेझाक केली जाते. वय, शिक्षण, दृष्टिकोन, स्वभाव, व्यसन, अनुवंशिकता, घराणे, पत्रिका, मालमत्ता, आरोग्य, चारित्र्य, सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसाय किंवा नोकरी, आर्थिक पात्रता, वास्तव्य असे निकष लावले जातात. परंतु, या निकषांना एक क्रम लावणे गरजेचे आहे. शिक्षण, चांगली नोकरी, व्यसन नसणे याला प्रमुख निकष म्हणून तर मालमत्ता, सामाजिक प्रतिष्ठा, पत्रिका यांना फारसे महत्त्व देणार नाही, अशी एखादी व्यक्ती ठरवू शकते.
सर्वसाधारणपणे शिक्षण, आवड, निवड, छंद, जात-धर्म या तोडीच्या किंवा सारख्याच आहेत का, याकडे पालक आणि मुलेदेखील लक्ष देतात. मात्र वेगळ्या पद्धतीने थोडा विचार केला तर भिन्नता असल्यास वेगवेगळे अनुभव अनुभवण्यास मिळू शकतात आणि जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो. एकमेकांच्या वेगळ्या अनुभवामुळे आपले व्यक्तिमत्व आणि जीवन समृद्ध होऊ शकते. एकमेकांना आडकाठी न आणता स्वत:चे छंद, आवडी-निवडी जोपासता येतात. विवाह ठरताना पालक हे स्थैर्य प्राप्त करून देणाºया निकषांवर अर्थात् शिक्षण, नोकरी, आर्थिक सुबत्ता, स्थावर मालमत्ता याला प्राधान्य देतात. तर तरुण मुले-मुली, स्वभाव, आवडी-निवडी, छंद, व्यसन, चारित्र्य यावर भर देतात. या निकषांचा गुणदोष या स्वरुपात विचार केला पाहिजे. आपणाला काय चालेल, काय चालणार नाही? हे ठरविता आले पाहिजे. किमान चार गुण असावेत व हे चार दोष नसावेत, असे आपण ठरविले पाहिजे.
विवाहाच्या उंबरठ्यावर उभे असताना मी विवाह करण्यास योग्य आहे का? अर्थात् विवाहाची योग्यता चार पातळींवर तपासायला हवी. शारीरिक, भावनिक, वैचारिक आणि व्यावहारिक. शारीरिक याचा अर्थात् दिसणे इतका मर्यादित अर्थ नाही. यामध्ये स्वास्थ्य हे महत्त्वाचे आहे. काही अनुवंशिक आजार आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. भावनिक पातळीवर आपल्यातील राग, लोभ, मत्सर, चिंता, प्रेम याची जाणीव असली पाहिजे. स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. मात्र स्वभावाला औषध असते आणि ते बाहेर मिळत नाही. तर ते आपल्याकडेच असते. ते कसे वापरायचे हे आपल्याला कळले पाहिजे. एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात आलीच नाही, तर माझ्या जीवनाला काही अर्थच नाही हे चुकीचे आहे.
आपल्या भावना व विचार हे प्रसंग आणि परिस्थिती पाहून व्यक्त केल्या पाहिजेत. भावनेवर आणि विचारांवर ताबा असेल तरच आपले वर्तन योग्य पद्धतीने घडू शकते. विवाहाच्या उंबरठ्यावर असताना आपल्या जोडीदाराची वैचारिक प्रगल्भता लक्षात घेतली पाहिजे. त्याची जीवनमूल्ये, कुटुंबातील संस्कार, शिक्षण, वाचन, छंद, सामाजिक, कौटुंबिक भूमिका या सर्वातून जोडीदाराची किती व कशी वैचारिक बैठक आहे हे लक्षात येते. त्याच वैचारिक बैठकीवरून जीवनाचा दृष्टिकोन समजतो. समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि परिस्थितीची जाण त्याला येऊ शकते. भान ठेवून वागण्याचे कौशल्य त्याला प्राप्त होते. असा जोडीदार चांगला जोडीदार ठरू शकतो. शिक्षण, उत्तम रोजगाराच्या संधी, व्यवहारात माणसे जोडण्याचे कौशल्य यामुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते.
चांगले जीवन जगण्याकरिता आवश्यक पैसा कमाविणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे विवाहाच्या उंबरठ्यावर असताना किमान गरजा पूर्ण करण्याची क्षमता अंगी असणे गरजेची आहे. जोडीदाराचीदेखील या सर्व बाजूंनी ओळख करून घेणे आवश्यक आहे. नातेसंबंध टिकविताना लैंगिक, मातृत्वाच्या जबाबदा-या पेलताना, कुटुंब उभारताना अनेक कडू-गोड अनुभव आपल्याला येतात. अशा स्थितीत बदलणा-या प्रक्रियेवर विश्वास ठेवून व्यक्तींचा आणि परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे असते.
(लेखक हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत.)