नवीन पुलाचे ५ जूनला लोकार्पण
By admin | Published: June 4, 2017 01:25 AM2017-06-04T01:25:02+5:302017-06-04T01:25:02+5:30
महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणार आहे. भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्या वर्षी २ आॅगस्टला अतिवृष्टीमुळे कोसळला होता. या दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल नव्याने बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या आश्वासनाची पूर्तता त्यांनी मुदतीपूर्वी केली आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या, अर्थात महाड जंक्शन ते रायगड किल्ला (जिजाऊमाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेलेल्या आंबवडे-राजेवाडी या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजनही या वेळी होणार आहे. या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र म केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहनिर्माणमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, उद्योग व खाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे, अशी माहितीही आमदार ठाकूर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती झालेल्या या परिषदेस भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, अनेष ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रमी वेळेत काम पूर्ण
सावित्री नदीवरील नवीन पुलाच्या कामाला १५ डिसेंबर २०१६ रोजी सुरुवात होऊ न, ३१ मे २०१७ रोजी काम पूर्ण झाले आहे. वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सहा महिन्यांच्या आत विक्र मी वेळेत हे काम केले असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.
नव्या पुलाची वैशिष्ट्ये
१.गाळे रचना :- एकूण ११ गाळे व त्यांची लांबी २३९ मी.
२.पाण्याचा प्रकार :- ओपन फाउंडेशन २ मी. खोल.
३.पुलाची रु ंदी :- १६ मी. (३ पदरी)
४.जोड रस्ता :- मुंबई व गोवा बाजूस मिळून ६४० मी.
५.पुलावर रात्रीसाठी पथदीप सुविधा व पदपथ (फुटपाथ).
६.पूर गजर प्रणाली, गंजरोधक सळ्या, रस्ता सुरक्षा उपाययोजना आणि अॅन्टी कार्बोनेशन रंग.
७. १६५ दिवसांत काम पूर्ण.
८. ३५.७७ कोटी रुपये खर्च.