प्रकाशन विश्वातील ‘टार्गेट’ क्वीन
By admin | Published: March 8, 2016 02:54 AM2016-03-08T02:54:12+5:302016-03-08T02:54:12+5:30
डॉ. कल्पना गंगारामानी... अवघ्या ४५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रकाशन व्यवसायात उडी घेतली आणि स्वत:ची कंपनी स्थापन करत, टर्नओव्हर १७ कोटींवर पोहोचवला.
मनीषा म्हात्रे, मुंबई
डॉ. कल्पना गंगारामानी... अवघ्या ४५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रकाशन व्यवसायात उडी घेतली आणि स्वत:ची कंपनी स्थापन करत, टर्नओव्हर १७ कोटींवर पोहोचवला. प्रकाशन विश्वाच्या त्या ‘टार्गेट क्वीन’ ठरल्या आहेत.
कल्पना यांच्या वडिलांचा लिंबाचा व्यवसाय होता. दादर येथील मराठमोळ्या कुटुंबात चार भावंडांसोबत त्या वाढल्या. बीएएमएसची पदवी मिळवली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी, असे त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळावीत, म्हणून स्वत:च प्रयत्न सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २६व्या वर्षी त्यांनी प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले. भांडवलाचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. त्यांनी स्वत:कडील पुंजी खर्च करत ‘टार्गेट प्रकाशन’ सुरू केले. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम सोपा करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे प्रत्येक मांडणी, मजकुरावर भर दिला गेला. त्यासाठी मुंबईतल्या अनेक शाळांशी चर्चा करण्यात आली, सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. दिवसभर लेखक, शिक्षक यांच्या भेटीगाठी आणि रात्री त्याचा आढावा असा दिनक्रम होता. ज्युनियर केजीपासून महाविद्यालयापर्यंतच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. चार वर्षे स्ट्रगल केल्यानंतर, मातृत्वाच्या वाटेवर असताना टार्गेट प्रकाशन समूहाचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर झाले. अनेकदा मुलीला सोबत घेऊन कार्यालयात जावे लागे. रात्रभर जागून काम करावे लागे, पण त्यांनी हार मानली नाही. त्यामुळेच त्या आज हा टप्पा गाठू शकल्या आहेत.