रखडलेले निकाल जाहीर करा : युवासेनेचे आंदोलन
By admin | Published: July 27, 2016 02:39 AM2016-07-27T02:39:31+5:302016-07-27T02:39:31+5:30
विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या
मुंबई : विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुलगुरूंना विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्याकरिता वेळच मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात मंगळवारी युवासेनेने आंदोलन करत रोष व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध विषयांच्या ४२६ परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत २६१ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामधील ६५ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत, ७९ निकाल ४५ दिवसांत, ११७ निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अजूनही १६५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात युवासेनेने आवाज उठवत मोर्चा काढला होता.
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठाने घेतलेल्या शेकडो परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या निकालांच्या गुणपत्रिका मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठीचे प्रवेश रखडले आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थी संघटनांशी चर्चा
युवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने २ आॅगस्ट रोजी युवासेनेसह विद्यार्थी संघटनांसोबत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दर दोन महिन्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांसोबत खास बैठक घेण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.