येसूबाईची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 07:08 PM2019-07-04T19:08:02+5:302019-07-04T19:08:33+5:30
येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते..
पुणे : येसूबाईंची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय आहे. येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या या कार्यातून आमच्या फौजा अटकेपार गेल्या. शतके, सहस्त्रके ओलांडली तरीदेखील येसूबाईसाहेबांकडून घेतलेली प्रेरणा आपण विसरू शकणार नाही, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
इतिहास प्रेमी मंडळातर्फे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेच्या त्रिशताब्दीनिमित्त पुणे ते सातारा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते महाराणी येसूबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानाजवळ रथयात्रेचा शुभारंभ झाला. पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, देवदेवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, प्रा. सु. ह. जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यावेळी उपस्थित होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘महाराणी येसूबाई यांचे कार्य खूप मोठे आहे. छत्रपती संभाजी महाराजांनतर सर्व गोष्टी त्यांनी सांभाळल्या. त्यांच्या सुटकेच्या घटनेची आठवण ठेवून त्रिशताब्दी साजरी करणे ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. तसेच त्यांचे कर्तृत्व कधीही विस्मृतीत जाणार नाही.’
मोहन शेटे म्हणाले, ‘औरंगजेबाने सन १६८९ साली संभाजी महाराज गेल्यानंतर येसूबाई आणि युवराज शाहू राजांना कैदी बनविले. सन १७०७ मध्ये औरंगजेब मेल्यावर शाहू राजांची सुटका झाली. परंतु येसूबाईंना दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीच्या राजकारणाचा फायदा घेत चातुयार्ने येसूबाईंची सुटका केली. तीस वर्षांची शिक्षा भोगून ४ जुलै १७१९ रोजी येसूबाई राजधानी सातारा येथे आल्या. या घटनेला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल इतिहास प्रेमी मंडळातर्फे रथयात्रा काढून या घटनेची त्रिशताब्दी साजरी करण्यात आली.’
पुणे ते सातारा राजमाता येसूबाईंच्या पुतळा असलेल्या रथयात्रेस एसएसपीएमएस शिवाजी पुतळा येथून प्रारंभ झाला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सातारा येथील पवईनाका शिवाजी पुतळ्यापासून राजवाड्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
...........