रिलायन्सची खोदकामाची परवानगी रद्द

By admin | Published: December 23, 2014 12:36 AM2014-12-23T00:36:03+5:302014-12-23T00:36:03+5:30

शहरात ‘४ जी’ची लाईन टाकण्यासाठी रिलायसन्सने रस्ते खोदणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराला जोडलेली जलवाहिनी व वीज कनेक्शनची केबल तुटली आहे. रिलायन्सने गडर लाईनमध्येच

Reliance excavation permission | रिलायन्सची खोदकामाची परवानगी रद्द

रिलायन्सची खोदकामाची परवानगी रद्द

Next

काँग्रेसच्या घेरावानंतर आयुक्तांचे आदेश : गडर लाईन, नळ जोडण्या तोडल्या
नागपूर : शहरात ‘४ जी’ची लाईन टाकण्यासाठी रिलायसन्सने रस्ते खोदणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराला जोडलेली जलवाहिनी व वीज कनेक्शनची केबल तुटली आहे. रिलायन्सने गडर लाईनमध्येच पाईप टाकल्याने गडर चोक झाले आहेत. याची गंभीर दखल घेत काँग्रेसने आयुक्त श्याम वर्धने यांना घेराव घातला. रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करून त्यांच्याकडून नुकसीनाबाबत भुर्दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत आयुक्त वर्धने यांनी रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश हॉटमिक्स विभागाला दिले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी व नागरिक सोमवारी महापालिकेत धडकले. रिलायन्सवर कारवाई करा व ओसीडब्ल्यूकडून नागरिकांना पाठविण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांची चौकशी करण्याची मागणी करीत आयुक्तांना घेराव घातला.
आयुक्तांनी रिलायन्सचे अधिकारी मल्लिकार्जुन पाटील, सचदेव नेमा यांच्यासह ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी विकास ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांसमक्ष आयुक्तांना सांगितले की, रिलायन्सने ‘४ जी’ लाईन टाकण्यासाठी जयताळा रोडवरील सुर्वेनगर परिसरात केबल डक्ट टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. डांबरी रस्ते, सिमेंट रस्तेही खोदण्यात आले असून, ते पुन्हा दुरुस्त न करता तसेच सोडून दिले आहेत.
डक्टच्या माध्यमातून केबल टाकताना बऱ्याच नागरिकांचे नळ जोडणीचे व वीज कनेक्शनचे केबल तुटले आहेत. याशिवाय केबलचे पाईप गडरलाईनमध्ये टाकण्यात आल्यामुळे गडर चोक झाले आहेत. गडरचे पाणी शौचालय, बाथरूममध्ये साचत आहे.
नागरिकांनी याची तक्रार करूनही रिलायन्सने दखल घेतली नाही. शेवटी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित डक्ट जेसीबीने खोदून काढण्यात आले असता, गडरच्या आतमधून केबलचे पाईप टाकण्यात आल्याचे उघडकीस आले.
रिलायन्सचे अधिकारी महापालिकेलाही जुमानत नसल्याचे सांगत, संबंधित गडर दुरुस्तीवर येणारा खर्च रिलायन्सकडून वसूल करावा व हॉटमिक्स विभागाने केबल टाकण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. याची दखल घेत आयुक्त वर्धने यांनी रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले.
सोबत यानंतर अशा परवानगी देताना संबंधित भागातील नगरसेवक, वॉर्ड अधिकारी व अभियंता यांचे मत घेतले जावे, अशा सूचनाही त्यांनी हॉटमिक्स विभागाला दिल्या. आंदोलकांमध्ये प्रशांत धवड, रेखा बाराहाते. प्रेरणा कापसे, निमिषा शिर्के, सरस्वती सलामे, संजय महाकाळकर, अमान खान, गुड्डू तिवारी, अतुल कोटेचा, राजू व्यास, कमलेश समर्थ, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
ओसीडब्ल्यूच्या वाढीव बिलाची तपासणी करा
ओसीडब्ल्यूचे अधिकारी जलवाहिनी नसलेल्या भागातही टँकरने पाणीपुरवठा करीत नाही. नगरसेवकांच्या मागणीची दखल न घेता उलट त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकारांना आळा घालून नगरसेविका कैकाडे यांच्या पतीवर ओसीडब्ल्यूने दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी ठाकरे यांनी केली. सोबतच नागरिकांना अवास्तव बिल पाठवून नंतर ते कमी करण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आयुक्त वर्धने यांनी पाणी बिलाची शहनिशा करण्याचे तसेच कैकाडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूला दिले.

Web Title: Reliance excavation permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.