आराम बस अपघातात ५ ठार
By admin | Published: September 22, 2014 02:20 AM2014-09-22T02:20:31+5:302014-09-22T02:20:31+5:30
पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव खासगी आराम बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले
सावर्डे (जि. रत्नागिरी) : पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव खासगी आराम बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील अन्य २७ प्रवासी जखमी झाले असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या असुर्डे (ता. चिपळूण) गावी घडला.
सुनील गंगाराम कांबळे (२७), सतेज प्रभाकर वेतकर (१७) महेंद्र महादेव तांबे (३०) व एक
अज्ञात प्रवासी असे चार जण
जागीच ठार झाले. अज्ञात प्रवाशांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला
असून त्याच्याजवळ ओळख पटू शकेल, अशी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसाठी
अवघड बनले आहे. गंभीर
जखमी झालेल्या प्रियंका
विनोद वेतकर (४५) यांना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
साईपूजा ट्रॅव्हल्सची बस वरळीहून विजयदुर्गकडे येत होती. पहाटे असुर्डे घाटात धुके असल्याने चालक सुनील विष्णू टिकम (४७) रस्त्याचा अंदाज येत पहाटे सव्वापाचच्या सुमारास असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळली. बसमधील दिलीप तुकाराम पाडाळे (५३), अनिल विठोबा झिमण (२८), अमित जाधव (३०), पंकज तानाजी आतवकर (२५) आणि आत्माराम सीताराम वारीक (६२) या प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. (वार्ताहर)