वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:20 AM2019-08-11T05:20:56+5:302019-08-11T05:21:01+5:30
राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत.
मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) दिलेली मुदत १० आॅगस्टला संपली तरी विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे जमा करणे, शुल्क भरण्यासाठी १२ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना १० आॅगस्टला नजीकच्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सीईटी सेलने सध्याच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत येत्या दोन दिवसांत महाविद्यालयांना तशा सूचना देऊन महाविद्यालय सुरू ठेवून प्रवेश द्यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. वैद्यकीय संचालनालयानेही तशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांना जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध केल्याने असल्याने त्या महाविद्यालयाची यादी संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
सारचा उपयोग महत्त्वपूर्ण होता
सीईटी सेलमधून तंत्रशिक्षणाच्या प्रवेशातील झालेल्या किरकोळ अडथळ्यामुळे सार पोर्टल बंद करण्यात आले. याचा मुख्य फटका आता एमबीए प्रवेशानंतर मेडिकल प्रवेशाला बसला आहे. पूरस्थिती आणि पावसात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत त्या सार पोर्टलच्या सेतू केंद्रामुळे पूर्ण करता आल्या असत्या. आम्हाला पूरग्रस्त भागात जाऊन प्रवेशासाठी वेळ द्यावा लागला नसता, असे म्हणणे सीईटी सेलमध्ये आलेल्या एका पालकाने मांडले. मला सांगली येथील महाविद्यालय मिळाले आहे. पण पुरामुळे मला जाता येत नाही. सद्य:स्थितीत मला कोणत्याही सेतू केंद्रात जाऊन प्रवेश घेता येईल, असे पालकाने सांगितले.
जिल्हानिहाय आकडेवारी
सातारा : २१, सांगली : २०, कोल्हापूर : ३१, औरंगाबाद : १०१, नागपूर : १३१, मुंबई : ३६, मुंबई उपनगर : ५८, ठाणे : ७१, पुणे : ८७ .
मुंबईतील डॉक्टरांचे पथक
कोल्हापूर, सांगलीला रवाना
मुंबई : कोल्हापूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिकट पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथे आता वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने ३० डॉक्टरांचे एक पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. या काळात लागतील अशी औषधे आणि साधन सामुग्रीही त्यांनी सोबत नेली आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात मुंबईतील डॉक्टरांचे पथक व मदत पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी बैठकीत घेतला. मुंबईतही मुसळधार पावसात मिठी नदीचा धोका निर्माण होत असल्याने त्याबाबतही उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.