आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा
By admin | Published: November 1, 2015 03:15 AM2015-11-01T03:15:44+5:302015-11-01T03:15:44+5:30
आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
मुंबई : आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
या मुलांना शैक्षणिक शुल्काची माफी अशा उपाययोजना आधीच करण्यात आल्या होत्या. मात्र आता शिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंतचा खर्च शासन करेल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील, अशा उपाययोजना अद्याप होऊ शकलेल्या नाहीत पण त्याची आश्वासक सुरुवात मात्र झाली आहे, असे ते म्हणाले. दलित कुटुंबांना घरे बांधून देण्याबरोबरच घरांसाठी जमीनही शासनाकडून उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी २ लाख रुपये दिले जातील. राज्यात २.३० लाख आदिवासी कुटुंब बेघर आहेत. दरवर्षी त्यांच्यापैकी २५ हजार कुटुंबांना घरे बांधून देण्यात येतील. आदिवासी महिलांना बाळांत होण्याच्या तीन महिने आधी आणि तीन महिने नंतर शासनाकडून चौरस आहार मोफत दिला जाईल,
असे फडणवीस यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
जॅकेट मात्र तेच
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना जे निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते तेच आजही घातले होते. मध्यंतरी वजन वाढल्याने त्यांना ते तंग होत होते. आता त्यांनी वजन थोडे वजन कमी केले असून ‘मिशन वेट लॉस’हाती घेतले आहे.