बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 07:54 PM2024-08-03T19:54:41+5:302024-08-03T19:56:45+5:30
Eknath Shinde : अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजेच बीएएमएस करणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या पण अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे.
शनिवारी (ता. ३ ऑगस्ट) वर्षा बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थिती होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी बीएएमसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मुख्यमंत्र्यासमोर मांडला होता.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा… pic.twitter.com/kInEqA2KkB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 3, 2024
राज्याच्या ८५ टक्के कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७० टक्के कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.