दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय
By दीपक भातुसे | Published: July 1, 2023 09:03 AM2023-07-01T09:03:28+5:302023-07-01T09:05:07+5:30
Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे.
- दीपक भातुसे
मुंबई : राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध कामांसाठी राज्यातील जनतेला विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन, तसेच सेतू केंद्रावर दाखले मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. यात निवासाचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचा समावेश आहे. दाखले मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी विशेषतः आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होती. 'लोकमत'ने ही अडचण समोर आणली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे.
अर्जांची संख्या वाढली
- सर्व्हर गती मंदावल्याने दाखले विलंबाने मिळत आहेत. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते.
- मात्र, अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढायला ५ ते ६ मिनिटे लागत आहेत.
- एका सेतू केंद्रावर साधारणतः १५ ते २० हजार अर्ज येतात. मात्र, सध्या काही सेतू केंद्रांवर हा आकडा ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे.
-
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आम्ही सर्व्हरची संख्या वाढवत आहोत. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर अर्जाचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. -पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग