महाटीईटीच्या नव्या वेळापत्रकाने दिलासा
By admin | Published: May 18, 2016 03:46 AM2016-05-18T03:46:09+5:302016-05-18T03:46:09+5:30
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(महाटीईटी )मंगळवार, ७ जून रोजी घेण्यात येणार आहे
डहाणू/बोर्डी: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(महाटीईटी )मंगळवार, ७ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी सह अन्य तालुक्यातील परीक्षार्थ्यांना या नव्या वेळापत्रकाने दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१५ रविवार, १६ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या वेळी डिटीएड(पेपर एक) आणि बीएड (पेपर दोन) करिता अनेक होतकरूंनी परीक्षा दिली होती.
मात्र पेपरफूटीमुळे पेपर एकची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानुसार ही परीक्षा पुन्हा बुधवार, १८ मे रोजी होणार होती. परंतु, नव्या वेळापत्रकानुसार मंगळवार ७ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक यांच्या १८ मे रोजी परीक्षा असून, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेळापत्रक बदलल्याचे म्हटले आहे. या बाबतची बातमी लोकमतने १४ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर परीक्षार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातून डिटीएड व बीएड झालेल्या उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. मात्र शिक्षक नियुक्तीचे शासनाचे बदलते धोरण आणि शिक्षण संस्था चालकांचा कारभार यामुळे स्थानिक उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा अथवा विना अनुदानित शाळांमध्ये तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. काही आदिवासी उमेदवार शेती, रिक्षाचालक, गवंडी किंवा कारखन्यात बारा तास काम करून घर संसार सांभाळत आहेत. शिक्षकाची नोकरी मिळण्याचे स्वप्न धुळीला मिळाले होते. परंतु महाटीईटी जाहीर झाल्यानंतर आशेचा किरण त्यांना दिसतो आहे. त्यामुळे महाटीईटीचे महत्व त्यांच्या लेखी अधिक आहे. परंतु पेपरफुटीमुळे गालबोट लागून, परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होत असल्याची खंत परीक्षार्थ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
डिटीएड पदविका अभ्यासक्र मानंतर घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण करतात. मे महिना हा या परीक्षांचा काळ असतो. या वर्षी १८ मे रोजी पेपर आहेत. त्यामुळे महाटीईटीला मुकावे लागणार असल्याची भीती होती, दरम्यान ७ जून रोजी परीक्षा होणार असल्याची बातमी लोकमतमध्ये वाचल्यानंतर दिलासा मिळाल्याची प्रतिक्रि या संबंधीत उमेदवारांनी व्यक्त केली आहे.