पाणीकपातीमधून पुणेकरांना दिलासा
By admin | Published: May 10, 2017 08:03 PM2017-05-10T20:03:07+5:302017-05-10T20:03:07+5:30
जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता 15 जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता 15 जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून, या नियोजनामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरणामध्ये 6.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिका-यांनी माहिती दिली त्यावेळी हा साठा 7.70 टीएमसी होता. एकाच आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी झाले आहे.
पुणेकरांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. तशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पालकमंत्री गिरीष बापट अद्याप विदेश दौ-यावरून न परतल्याने पाण्यासंदर्भातील 11 मे रोजी होणारी आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बापट दौ-यावरून परतल्यावर ही बैठक घेण्यात येणार आहे.
खडकवासला धरणात असलेला पाणीसाठा पुरेसा असून पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोते यांनी सांगितले. सध्या पुण्याला दररोज 1350 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दहा एप्रिलला झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये खडकवासला धरणात 10.26 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोजचा पाणी वापर आणि उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 6.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.