कच्च्या कैद्यांना दिलासा अन् तुरुंगांवरील भारही होणार कमी
By यदू जोशी | Published: September 2, 2018 02:15 AM2018-09-02T02:15:31+5:302018-09-02T02:15:52+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. राज्यातील विविध तुरुंगांमध्ये खितपत असलेल्या कच्च्या कैद्यांना जामीन मिळवून देत तुरुंगावरील भार कमी करणे हा त्याचा उद्देश असेल.
बहुतेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट वा त्यापेक्षा जास्त कैदी आहेत. त्यातील २५ टक्के कैदी हे शिक्षा भोगत असून तब्बल ७५ टक्के कैदी हे
कच्चे आहेत. म्हणजे त्यांचा गुन्हा
सिद्ध झालेला नाही, पण त्यांना कोणत्याही कारणाने जामीन मिळू शकलेला नाही.
‘बेल अॅण्ड नॉट जेल’ असे
स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी हा निर्दोष आहे. त्याला जामीन द्या, कारागृहात टाकू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही कच्च्या कैद्यांनी तुरुंगात पडून राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही.
खटल्याचा निकाल लागत नाही तोवर त्यांना तुरुंगात राहण्याची वेळ येऊ नये, या उद्देशानेच मुख्यमंत्री फेलोशिप सुरू होणार आहे. त्यात तरुण वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल. प्रशिक्षणानंतर ते प्रत्यक्ष काम सुरू करतील. कारागृह प्रशासनाच्या परवानगीने हे फेलो सरकारी वकिलांसोबत जाऊन कैद्यांना भेटतील. त्यांना जामीन मिळावा यासाठीची पार्श्वभूमी तयार करतील आणि जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व वैधानिक प्रयत्न करतील.
अर्थात त्यासाठी गुन्ह्याचे स्वरूपही लक्षात घेतले जाईल. मुंबई उच्च न्यायालय, राज्य विधि सेवा प्राधिकरण आणि कारागृह प्रशासन यांच्यात या प्रोग्रामसाठी सामंजस्य करार झाला आहे.
कोटींची मदत
कच्च्या कैद्यांना तुरुंगातून बाहेर येऊन मोकळा श्वास घेता यावा यासाठीच्या संपूर्ण उपक्रमाला प्रख्यात उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या फाउंडेशनने ७५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य सरकारला केले आहे.
प्रमुख तुरुंगांमधील कैदी क्षमता अन् प्रत्यक्ष संख्या अशी
येरवडा 2449/5403
कोल्हापूर 1789/1873
मुंबई 804/2776
ठाणे 1105/3156
औरंगाबाद 579/1111
नाशिक रोड 3178/3509
नागपूर 1840/2308
अमरावती 973/1064
तळोजा 2124/2642
एकूण 14841/23842