सोयाबीन उत्पादकांना दिलासा; केंद्र सरकार राज्यात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 09:00 AM2024-09-09T09:00:44+5:302024-09-09T09:01:08+5:30
केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४,८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे
मुंबई/पुणे : केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी ही खरेदी केंद्रे सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने होकार दर्शविला आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४,८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता द्यावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच, या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संपर्कात होतो, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
४,२०० कोटी रुपये अनुदान
राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने ४,२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून, येत्या दोन-तीन दिवसांत या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मिळेल लाभ केंद्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचेही मुंडे म्हणाले.