पुन्हा दोन रुग्णालयांत तणाव
By Admin | Published: April 2, 2017 01:26 AM2017-04-02T01:26:52+5:302017-04-02T01:26:52+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते
औरंगाबाद : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते. तर, एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही रुग्णाच्या मृत्यूनंतर तशीच स्थिती उद्भवली होती. तर सेव्हन हिल परिसरातील जिल्ला हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार न झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणास उपचारासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटीतील अपघात विभागात आणल्यानंतर डॉक्टरांनी तासभर दुर्लक्ष केले. त्यानंतर किरकोळ उपचार करून त्याला घरी पाठवले; परंतु रुग्णालयाबाहेर पडताच रुग्णाचा मृत्यू झाला. ट्रॉमा केअरमध्ये दाखल करून केवळ उपचाराचा देखावा केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. शरद महावीर वायकोस (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. वेळेवर उपचार दिले असते तर माझा भाऊ प्राणाला मुकला नसता. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून हा सगळा प्रकार समोर येईल. घाटी प्रशासनाने योग्य तो न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद यांचा भाऊ प्रशांत वायकोस यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘जिल्ला’मध्ये तोडफोड
जिल्ला हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मेंदूविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती अधिक चिंताजनक होताच संतप्त नातेवाईकांनी धुडगूस घालून रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. रेल्वेस्टेशन परिसरातील ६८ वर्षीय महिलेवर २७
मार्च रोजी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याने आवश्यक शस्त्रक्रियेसाठी एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ४० वर्षीय रुग्णाचा शनिवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हृदयाच्या व्हॉलला इजा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून व्हॉल बदलला; परंतु या सगळ्यामध्ये रुग्णाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. प्रकाश नानाभाऊ गोंडे (रा. नारेगाव) असे मृत रुग्णाचे नाव आहे.