एक धार्मिक उन्माद

By Admin | Published: July 12, 2015 03:23 AM2015-07-12T03:23:26+5:302015-07-12T03:23:26+5:30

कोणत्याही धार्मिक सणाचे मूळचे उदात्त हेतू आणि स्वरूप फारच वंदनीय वाटते. मात्र आज त्यांचे दिसणारे बाजारी सादरीकरण पाहिल्यानंतर कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाते.

A religious frenzy | एक धार्मिक उन्माद

एक धार्मिक उन्माद

googlenewsNext

- ‘राशिचक्र’कार शरद उपाध्ये

अमृतकुंभ अन् मेळा!
समुद्रमंथनावेळी निघालेला अमृतकुंभ स्वर्गात नेत असताना देवांना दैत्यांचा विरोध होऊ लागला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी देवांनी पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी तो अमृतकुंभ ठेवला, त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. ज्या ज्या राशीमध्ये गुरू असता कुंभ ठेवला गेला त्या त्या राशीमध्ये गुरू आला की त्या ठिकाणी कुंभमेळा होतो. कुंभ राशीत गुरू असता हरिद्वार, वृषभ राशीत गुरू असता प्रयाग, सिंह राशीत गुरू असता त्र्यंबकेश्वर आणि गुरू सिंह राशीत असताना मेषेत सूर्य, तुळेत चंद्र व वैशाखी पौर्णिमा असा योग असता उज्जैन येथे कुंभमेळा असतो.

कोणत्याही धार्मिक सणाचे मूळचे उदात्त हेतू आणि स्वरूप फारच वंदनीय वाटते. मात्र आज त्यांचे दिसणारे बाजारी सादरीकरण पाहिल्यानंतर कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवातील किळसवाणा धांगडधिंगा, दिवाळीतील फटाक्याच्या आवाजाचे प्रदूषण, पुण्यपुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या अशा तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा अनेक अभिमान वाटावा अशा दिवशी लोकांचे बेजबाबदारीचे वर्तन आणि असे अनेक उत्सव मूळ उद्देशापासून खूपच दूर भरकटलेले दिसतात. धार्मिक उत्सव साजरे करतानाही परमेश्वरावरील प्रेमापेक्षा आपला आनंद कसा उपभोगता येईल याकडेच लक्ष असते. व्याकूळ आर्ततेपेक्षा नेत्रदीपक प्रदर्शनाकडेच जास्त लक्ष दिले जाते. आंतरिक प्रेमापेक्षा बाह्य सजावटीची काळजी घेतली जाते.
लवकरच येणारा सिंहस्थ कुंभमेळा हे त्याचे आणखी एक उदाहरण. ३१ मे २०१५च्या एका वर्तमानपत्रात अंगावर ४ कोटी रुपयांचे ११ किलो सोन्याचे दागिने घालून त्र्यंबक नगरीत प्रवेश केलेल्या एका गोल्डनबाबाचे फोटो झळकले आहेत. दिल्लीतील एका आखाड्याचे ते सर्वेसर्वा आहेत. अंगावर वैराग्यदर्शक भगवी वस्त्रे आणि गळ्यात, हातात, कमरेला सोन्याचे दागिने हा केवढा विरोधाभास! हे गोल्डनबाबा सिंहस्थ पर्वकालात काही महिने त्र्यंबकेश्वरला राहणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. भक्तांमध्ये बाबांच्या या वागण्याने किती चुकीचा संदेश जाण्याचा संभव आहे आणि वैचारिक गोंधळ होणार आहे याचा विचार बाबांनी करायला नको का?
सिंहस्थ पर्वकाळात हजारो साधू, मंडलेश्वर, नंगे बाबा, उग्र चेहऱ्याचे महंत आपल्या दांडगट अनुयायांसह थाटामाटात येऊन कधी कधी दंगामस्ती करून स्नान, दान, मुंडनादी तीर्थविधी करतात. प्रचंड गोंगाट असतो. वेगवेगळ्या आखाड्यांचे मानापमान असतात. खरे अध्यात्म हरवलेले असते. सामान्य भक्तांचे हाल होतात. अध्यात्मिक शांती औषधालाही अनुभवास येत नाही. फक्त धार्मिक उन्माद दिसतो. परमेश्वरावरील प्रेमापेक्षा आपली पापकर्मे धुवून निघावीत, म्हणून निरनिराळे निरर्थक विधी करण्यासाठी येणारी स्वार्थी माणसेच जास्त दिसतात आणि अशा कुंभमेळ्यांसाठी करोडो रुपये शासनाकडून निधी स्वरूपात मंजूर केले जातात, तेव्हा आश्चर्य वाटते. कारण उपासमारीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेकडो शेतकरी रोज आत्महत्या करीत असताना, त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. कर्मठ मंडळींच्या निरर्थक अध्यात्मिक ढोंगाचे लाड नसावेत. तीनशे वर्षांपूर्वीच्या सनातन काळातही निर्भीड, स्पष्टवक्त्या, फटकळ, भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ढोंगी भक्तांना सात्विक संतानाने विचारले होते,
आली सिंहस्थ पर्वणी। न्हाव्यां भटां झाली धणी।।
अंतरी पापाच्या कोडी। वरि वरि बोडी डोई दाढी।।
बोडिले ते निघाले । काय पालटले सांग वाहिलें।।
पाप गेल्याची काय खूण। नाही पालटले अवगुण।।
भक्तिभावेवीण। तुका म्हणे अवघाचि सीण।।
खरोखरच भक्तमंडळींनी, समाजाने, राज्यकर्त्यांनी वरील ओव्यांचे सखोल चिंतन करावे म्हणजे कुं भमेळ्याच्या वांझोट्या भक्तीच्या बाजारीकरणाचे ओंगळ स्वरूप लक्षात येईल. शासनाने भलामोठा निधी मंजूर करावा अशी कुठलीही विधायक फलश्रुती कुंभमेळ्यापासून मिळत नाही. भक्तिभावाने ओथंबलेले असे किती भक्त कुंभमेळ्यास येत असतील! निरर्थक कर्मकांड करणारेच बहुतेक जण दिसतात. त्रिकाल स्नान करणाारे साधू असतील तर मासे अखंड गंगेतच राहतात. वायू आहार करणारे संत म्हणावे तर सर्र्प सतत वायू भक्षणच करतो. गुहेत राहणाऱ्याला साधू म्हणावे तर उंदीरही बिळातच राहतात. अंगाला राख फासणारा वैरागी असेल तर सतत उकिरड्यावर लोळणाऱ्या व राखेने माखलेल्या गाढवालाही वैरागी म्हटले पाहिजे. ध्यान करणारा भक्त म्हणावा तर बगळा नित्य ध्यान करतानाच भासतो. बाह्य लक्षणांनी कोणीही मोक्षपदाला गेल्याचे ऐकिवात नाही. अंतर्लक्षण हेच खऱ्या संताचे स्वरूप. अंत:करणाने निर्मल आणि वाचेने रसाळ असलेल्याच्या गळ्यात माळ असो नसो, आत्मसाक्षात्कारी पुरूषाच्या माथ्यावर जटा असोत नसोत, परस्त्रीच्या ठायी नंपुसक असलेल्या आणि परद्रव्याच्या ठिकाणी आंधळा असलेल्याच्या तसेच परनिंदेच्या ठायी मुक्या असलेल्या माणसाच्या अंगाला भस्म लावलेले असो नसो. खरा संत तोच: परमार्थ तो नोहे लेकुराच्या गोष्टी, अनुताप पोटी व्हावा लागे हेच खरे.

 

Web Title: A religious frenzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.