रेस्टॉरंट सुरू झाले, धार्मिक स्थळेही उघडणार; मुख्यमंत्री करताहेत संबंधितांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 06:16 AM2020-10-06T06:16:21+5:302020-10-06T06:41:06+5:30

सरकारवर विविध संघटना, संस्थानांचा दबाव

religious places will open soon cm uddhav thackeray discussing issue organisations | रेस्टॉरंट सुरू झाले, धार्मिक स्थळेही उघडणार; मुख्यमंत्री करताहेत संबंधितांशी चर्चा

रेस्टॉरंट सुरू झाले, धार्मिक स्थळेही उघडणार; मुख्यमंत्री करताहेत संबंधितांशी चर्चा

Next

मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले. आता मंदिरे व इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली. रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे. विविध राज्यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. महाराष्ट्रात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.

शाळा सुरू करण्यासाठी केंद्राची नियमावली जारी
देशभरातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देताना, केंद्र सरकारने त्यासाठीची नियमावली सोमवारी जारी केली. मात्र प्रत्यक्ष शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थिती पाहून घ्यायचा आहे.

केंद्राने परवानगी दिली असली तरी जवळपास सर्व राज्यांनी नोव्हेंबरमध्ये वा त्यानंतर शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. इतक्यात शाळा सुरू करू नयेत आणि त्या सुरू केल्या तरी आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे बहुसंख्य पालकांचे म्हणणे आहे.

शिर्डीची संपूर्ण अर्थव्यवस्था ही येथील श्री साईबाबा मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर खुले करावे अशी लाखो भक्तांची मागणी आहे. राज्यातील मंदिरांवर अनेक घटक अवलंबून आहेत हे लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
- सुरेश हावरे, अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

Read in English

Web Title: religious places will open soon cm uddhav thackeray discussing issue organisations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.