दर्जाच्या जोरावर लिडकॉमच्या उपक्रमाची पुन्हा भरारी
By admin | Published: June 12, 2017 02:32 AM2017-06-12T02:32:37+5:302017-06-12T02:32:37+5:30
येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ‘लिडकॉम’ या पादत्राणे उत्पादन केंद्राची उत्पादने एकेकाळी केवळ शासकीय
संतोष भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ‘लिडकॉम’ या पादत्राणे उत्पादन केंद्राची उत्पादने एकेकाळी केवळ शासकीय अस्थापनांसाठीच वापरण्यात येत असत; पण आता लिडकॉम खासगी बाजारपेठेतील स्पर्धेत उतरली आहे. मनुष्यबळाअभावी विक्री केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. मात्र, तरीही ग्राहक थेट कारखान्यातूनच चपला व बुटांची खरेदी करीत आहे.
पूर्वी एसटी महामंडळ, शासकीय कार्यालय, पोलीस प्रशासन आदी विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बुट पुरविण्याचे कंत्राट मिळायचे. आता ते सर्व बंद झाले; परंतु ग्राहकांचा या उत्पादनावर विश्वास असल्याने, थेट खासगी बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय लिडकॉमने घेतला आहे.
लिडकॉमची दर्यापूर, कोल्हापूर व हिंगोली अशा केवळ तीनच ठिकाणी उत्पादन केंद्रे असून वाशी, वांद्रे, नांदेड, जळगाव, भुसावळ, सोलापूर या ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. सध्या या विक्री केंद्रांवर उत्पादनाला मोठी मागणी आहे.
हिंगोलीत उत्पादन केंद्रावर असलेल्या आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे लिडकॉमच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिंगोली येथील पादत्राणे उत्पादन केंद्रात अवघ्या चार मिनिटांत ९ जोड बनविले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते.
व्यवस्थापकीय संचालक रूपेश जयवंशी यांनी या ठिकाणी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. येथे स्वतंत्र डिझायनर असल्यामुळे आतापर्यंत १० ते १५ प्रकारची डिझायन बनविलेली आहेत. दिवसेंदिवस या उत्पादनाची मागणी वाढल्याने येथे आणखी एक इमारत उभारण्यात येणार आहे.