Remadesivir: रेमडेसिविरची ६३ हजार इंजेक्शन शिल्लक; त्यात महागडे टोसिलिझुमॅबही मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 06:11 AM2021-04-23T06:11:34+5:302021-04-23T06:12:25+5:30
Remadesivir shortage in Manharashtra: केंद्राच्या भूमिकेमुळे पुरवठा निम्म्याच्या खाली; आरोग्य विभागाचे सहसचिव डॉ. मनदीप भंडारी यांनी दिल्लीतून एक पत्र राज्यातील सर्व मुख्य सचिवांना पाठविले आहे. त्यात त्यांनी २१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी किती रेमडेसिविर देणार हे कळविले आहे.
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची साथ वाढल्यामुळे औषधांची आणीबाणी सुरू झाली असून, संपूर्ण राज्यात गुरुवारी सायंकाळी फक्त ६३,४७१ रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होते. रेमडेसिविर मिळेनासे झाल्यामुळे आता खाजगी हॉस्पिटलमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शन आणण्यास सांगितले जात असून, तेदेखील कुठेही उपलब्ध नाही. हे परदेशी इंजेक्शन आहे व त्याची किंमत ३५ ते ४० हजार रुपये आहे. या इंजेक्शनच्या फक्त १४७ कुप्या राज्यात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे राज्याला ज्या ठिकाणी रोज ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळत होते ते आता एकदम २६ हजारांवर आले आहेत.
आरोग्य विभागाचे सहसचिव डॉ. मनदीप भंडारी यांनी दिल्लीतून एक पत्र राज्यातील सर्व मुख्य सचिवांना पाठविले आहे. त्यात त्यांनी २१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी किती रेमडेसिविर देणार हे कळविले आहे. त्यात राज्याला रोज फक्त २६,९०० इंजेक्शन्स मिळतील. त्यावर एफडीए मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा आदेश येण्याआधी आम्हाला जास्त इंजेक्शन्स मिळत होते; पण आता तेदेखील नव्या आदेशामुळे कमी झाले आहेत. कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत, यानुसार वाटप केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. पण, भाजपचे राज्यातील नेते यावरही केंद्राची बाजू घेत आहेत.
राज्य सरकारने आयएएस अधिकारी विजय वाघमारे व डॉ. सुधाकर शिंदे यांची यासाठी समिती केली आहे. हे दोन्ही अधिकारी सात कंपन्यांशी सतत संपर्क साधून होते.
राज्याला रोज ६० हजार इंजेक्शन्स मिळत असताना केंद्र सरकारने नवीन आदेश काढून महाराष्ट्राचे नुकसान केल्याची प्रतिक्रिया गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर राज्यातल्या भाजप नेत्यांनी महाराष्ट्राची बाजू धरून जास्तीतजास्त औषधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ही राजकारणाची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र महाराष्ट्राची मागणी २६ हजार इंजेक्शन्सची होती. आता महाराष्ट्राला १० दिवसांत २ लाख ६० हजार रेमडेसिविर मिळणार आहेत, असे सांगत केंद्राची पाठ थोपटली आहे.
कोरोनाच्या रुग्णांनी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेणे सुरू केले आणि सुरुवातीच्या काळातच जर ‘फेविपिराविर’सारख्या गोळ्या सुरू केल्या तर रुग्ण बरे होत आहेत; पण सध्या महागडी औषधी देण्याचा आणि ती वापरून पाहण्याचा कल वाढत चालला आहे. त्याला काय करणार? असे मत टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले. एखाद्या औषधाचे दिवस असतात. टोसिलिझुमॅब हा काही रामबाण उपाय नाही, त्याऐवजी इटोलिझुमॅबदेखील चालेल. तेही पयत्न केले तर मिळेल, असे सांगून डॉ. ओक म्हणाले, ‘टोसि’चे दुष्परिणाम खूप आहेत. त्यामुळे त्याचा विचारपूर्वकच वापर करावा, असे आम्ही सतत सांगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रूक फार्मा आणि बीडीआरकडून एकही रेमडेसिविर नाही
n ज्या ब्रूक फार्मा आणि बीडीआर या दोन कंपन्यांवरून गेले काही दिवस गदारोळ झाला. ब्रूक फार्मा आपल्याला ५० हजार इंजेक्शन देण्यास तयार आहे, असे भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले होते.
n त्या कंपनीला परवानगी देऊन आता चार दिवस झाले; पण त्यांच्याकडून एकही इंजेक्शन आलेले नाही. ज्या बीडीआरसाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आग्रही होते त्यांच्याकडूनदेखील एकही रेमडेसिविर आले नाही, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी सांगितले.