उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:10 PM2024-10-21T14:10:03+5:302024-10-21T14:16:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे, तर मविआमध्ये जागावाटपावरून आघाडी कोणत्याही क्षणी तुटेल अशी स्थिती आहे. काँग्रेस-उद्धव ठाकरे शिवसेनेत १७ जागांवरून वाद विकोपाला गेला असून मातोश्रीसमोर न झुकण्याची भुमिका राज्यातील नेत्यांनी घेतली आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या गोटातून खळबळजनक वृत्त येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे. याची चाहूल लागताच दोन्ही आमदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. ठाकरे गटाची ताकद कोकण पट्टा आणि मुंबईत जास्त आहे. तिथे भाजपा आणि शिंदे गटाचे तगडे आव्हान आहे. यामुळे उद्धव ठाकरे ताकही फुंकून पित असल्याची स्थिती आहे. उमेदवार निवडताना चांगली टक्कर देऊ शकेल असा उमेदवार त्यांना द्यावा लागणार आहे.
मुंबईत कट्टर विरोधक भाजपाची आणि शिंदे शिवसेनेची ताकद आहे. परंतू सोबत असलेल्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तर आघाडी झाली तरी काँग्रेसची ताकद कामी येईल याची शाश्वती नाही. यामुळे ठाकरे इतर मतदारसंघांत विद्यमान आमदारांना तिकीट देणार असले तरी शिवडी आणि चेंबूरमध्ये नव्या चेहऱ्यावर डाव लावण्याची शक्यता आहे.
यामुळे शिवडीचे आमदार अजय चौधरी व चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर हे दोघेही मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवडीमधून इच्छुक असणारे लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे देखील मातोश्रीवर आले आहेत. चेंबूरमधून माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे. यामुळे ठाकरे या दोन आमदारांना वगळून त्यांचे तिकीट इच्छुक उमेदवारांना देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचबरोबर इतर मतदारसंघातील इच्छुकही मातोश्रीवर दाखल होत आहेत. भायखळ्यातून रमाकांत रहाटे, मनोज जामसुतकर, किशोरी पेडणेकर या इच्छुक आहेत. घाटकोपर पश्चिममध्ये सुरेश पाटील आणि संजय भालेकर हे स्पर्धेत आहेत. मागाठाणेमध्ये संजना घाडी आणि उदेश पाटकर इच्छुक आहेत. तर कुर्ल्यामधून प्रविणा मोरजकर या इच्छुक आहेत.