Remdesivir Injection : रेमडेसिविरचा ठणठणाटच; प्रशासन हतबल, ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:44+5:302021-04-13T07:12:13+5:30

Remdesivir Injection : परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे आणि शासकीय रुग्णालयांत या इंजेक्शन्सचा ठणठणाट पडल्याचे ‘लोकमत’ चमूने राज्यातील निवडक महापालिका क्षेत्रांत केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित झाले आहे.

Remdesivir Injection: Remdesivir Injection; Administration troubles, underlined from ‘Reality Check’ | Remdesivir Injection : रेमडेसिविरचा ठणठणाटच; प्रशासन हतबल, ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित 

Remdesivir Injection : रेमडेसिविरचा ठणठणाटच; प्रशासन हतबल, ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित 

googlenewsNext

राज्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी प्रचंड वाढल्याने साठेबाजी व काळाबाजार सुरू झाला आहे. गेल्या वर्षी दररोज या इंजेक्शन्सच्या ३० हजार व्हायल्स लागायच्या. सध्या हे प्रमाण ५० हजार व्हायल्सवर गेले. परिणामी, परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे आणि शासकीय रुग्णालयांत या इंजेक्शन्सचा ठणठणाट पडल्याचे ‘लोकमत’ चमूने राज्यातील निवडक महापालिका क्षेत्रांत केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित झाले आहे.

पुणे : गरज २० हजार, साठा सहा हजार
पुणे शहरात गरज २० हजार इंजेक्शनची आणि केवळ सहा हजारच इंजेक्शन उपलब्ध असल्याने नातेवाइकांची वणवण सुरूच आहे.
पुण्यामध्ये सरकारी आणि खासगी मिळून सर्व हॉस्पिटलने २० हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. मात्र, टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार केवळ १५ ते २० टक्के रुग्णांनाच इंजेक्शनची खरी गरज आहे. त्यामुळे टास्क फोर्सने सांगितल्यानुसार रुग्णालयातील एकूण रुग्णांपैकी केवळ सरासरी १५-२० टक्के पुरवठा होत आहे.
६००० - उपलब्ध साठा
२०००० - गरज

ठाणे : कोविड सेंटरमध्ये २ दिवसांचा साठा
मागील काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यातही रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रविवारपर्यंत १५००च्या आसपास रेमडेसिविरचा साठा उपलब्ध होता. दोन दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे खासगी रुग्णालयातून मागणी होत असली तरी, त्यांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. खासगी रुग्णालयांत साठा नसल्याने नातेवाइकांची रेमडेसिविर शोधण्याची मोहीम सुरूच आहे.
१५०० - उपलब्ध साठा
२००० - गरज

नागपूर : ४५०० रेमडेसिविरची दररोज मागणी
नागपूर शहर व  जिल्ह्यात रुग्णवाढीसोबतच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांना  रेमडेसिविरसाठी धावपळ करावी लागत आहे.  खासगी रुग्णालयात यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. 
रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. जादा पैसे देऊनही इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. कुणावरही कसलेच नियंत्रण नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. 
४०००- उपलब्ध साठा
४५००- गरज

नाशिक: महापालिकेचा साठा आला संपुष्टात
नाशिक महापालिकेत सध्या रेमडेसिविरचा साठा केवळ ५० शिल्लक आहे. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार अद्याप तरी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांना किंवा खासगी रुग्णालयांना अद्याप पुरवठा करण्यात आलेला नाही. महापालिका रुग्णालयातील रुग्णांना सध्या रेमडेसिविरचे इंजेक्शन दुपारनंतरच दिले जाते. रुग्णांना सोमवारचा रेमडेसिविरचा डोस मिळालेला नव्हता. थेट कंपन्यांकडेच २० हजार डोसची मागणी नोंदवली आहे. मात्र, त्यातील केवळ ५ हजार पुरवठा होणार आहे. 
५०- उपलब्ध साठा
३५०- गरज

अमरावती: रोज हवेत ३५० हून अधिक रेमडेसिविर
अमरावती जिल्ह्यात सध्या रोज ३५०-४०० रेमडेसिविर इंजेक्शन्स लागतात. सोमवारी शासकीय रुग्णालयांत ४,००० व्हायल उपलब्ध होते. ४०० व्हायल येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलला (पीडीएमएमसी) देण्यात आलेले आहे. शहरात २३ खासगी कोविड हॉस्पिटल्स आहेत. त्यांच्या मेडिकल स्टोअर्समध्ये सोमवारी सिप्ला कंपनीचे ३५० व्हायल उपलब्ध झाल्याचे एफडीएने सांगितले. नागपूर डेपोकडे २,००० व्हायलची मागणी नोंदविण्यात आली आहे. 
४०००- उपलब्ध साठा
३५०- गरज

जळगाव: खासगी रुग्णालयात मोठा तुटवडा
सोमवारी रेमडेसिविरचे ५३० इंजेक्शन प्राप्त झाले.  मात्र, मागणीच्या हा दहा टक्के पुरवठा असल्याचे औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांनी सांगितले. शासकीय यंत्रणेत पुरेसा साठा शिल्लक असून केवळ खासगी कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन मिळत नसल्याची स्थिती आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शासकीय रुग्णालयांमध्ये अतिरिक्त साठा होता. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तो नव्हता, अशा वेळी अचानक रुग्ण वाढल्याने खासगी यंत्रणेत हा तुटवडा निर्माण झाला. 
५३०- उपलब्ध साठा
५०००- गरज

नांदेड: नातेवाइकांची धावाधाव सुरूच
रेमडेसिविर इंजेक्शनवरून जिल्ह्यात गोंधळाची स्थिती आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी आदेश काढून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रुग्णालयावर सोपविली आहे. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ थांबेल अशी अपेक्षा हाेती. मात्र, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनची उपलब्धता अत्यल्प आहे. सोमवारी प्रशासनाकडून ६०० इंजेक्शन उपलब्ध झाले. त्यामुळे सोमवारी रुग्णालयांनी पुन्हा नातेवाइकांनाच रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले. 
५०- उपलब्ध साठा
३५०- गरज

Web Title: Remdesivir Injection: Remdesivir Injection; Administration troubles, underlined from ‘Reality Check’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.