दंगामस्ती करणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा
By admin | Published: November 16, 2015 02:56 AM2015-11-16T02:56:50+5:302015-11-16T02:56:50+5:30
‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो.
पूजा दामले, मुंबई
‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो. अनेक वेळा समजावूनसुद्धा ही मुले ऐकत नाहीत. त्यामुळे आता नेमके काय करायचे? असा प्रश्न पालकांसमोर असतो. पाल्यांमुळे त्रस्त पालकांसाठी मुंबईत एक खास ‘हेल्पलाइन’ सुरूकरण्यात आली आहे. या हेल्पलाइनद्वारे पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंबेच दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांना मुलांच्या समस्या सोडवताना नाकीनऊ येतात. त्यांना योग्य पर्यायदेखील मिळत नाही. पर्यायाने पालक आणि मुलांमधील संवादात दरी निर्माण होत जाते. या सर्वांवर पर्याय म्हणून पालकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे ‘परिसर आशा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सवूर यांनी सांगितले.
अभ्यास करणारा मुलगा किंवा मुलगी अचानक अभ्यास करेनाशी होते. एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ही मुले चिडचिड करतात. अशा वेळी पालकांना मुलांशी कसे वागावे, हे समजत नाही, पण अजूनही अशा प्रश्नांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे पालक टाळतात. हा पर्याय सहसा निवडला जात नाही. पाल्यामुळे त्रस्त असलेल्या पालकांना आधार म्हणून पालकांसाठी ही खास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शिक्षक दिनापासून ही हेल्पलाइन प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरण्यात आली असून, आत्तापर्यंत ६० ते ६५ कॉल्स हेल्पलाइनवर आल्याचे आरती यांनी सांगितले.
अनेकदा पालकांना समोरासमोर बोलणे शक्य नसते, वेळेच्याही मर्यादा असतात, पण फोनवर पालकांची ओळख उघड होत नाही. त्यामुळे पालक फोनवर दिलखुलासपणे बोलतात. सगळ््या समस्या सविस्तरपणे सांगतात. मग फोनवरच पालकांचे समुपदेशन केले जाते, पालकांना मार्गदर्शनही केले जाते, पण प्रश्न खूपच जटिल असल्यास पालकांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येते. याद्वारे पालकांना नवीन दिशा मिळते, असे आरती यांचे म्हणणे आहे.