‘त्यां’च्या कार्यतत्परतेमुळे सामान्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 01:22 AM2016-09-10T01:22:54+5:302016-09-10T01:22:54+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला
टाकळी हाजी : पारनेर तालुक्यातील; परंतु सध्या पोलीस खात्यात नाशिक शहरात असणाऱ्या सरकारवाडा पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्या कार्यक्षम कार्यतत्परतेमुळे तालुक्याची नावलौकिकात भर पडली आहे.
एका खासगी मैत्रीय कंपनीने ठेवीदारांना व्याज व एजंट लोकांना कमिशन वाढ, अशी भुरळ पाडून तब्बल २ लाख कुटुंबांना १४०० कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये या गरीब ठेवीदारांनी कोल्हे यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला.
कोल्हे यांनी लगेच त्यांची फिर्याद संबंधित कंपनीच्या विरोधात घेऊन योग्य पद्धतीने तपास करीत कंपनीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या कंपनीच्या संचालकांना त्वरित अटक करून, सन १९७८ चे कलम ३, ४, ५ व ६ अन्वये दाखल करून, अत्यंत महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना शिक्षा देण्याचे काम केले आहे; तसेच गुन्ह्याचा तपास उत्कृष्टपणे करीत न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्रा दाखल केले.
ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत म्हणून न्यायालयाच्या आदेशाने एस्क्रो खाते उघडून त्यात रक्कम जमा करण्याची कारवाई केली. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात ठेवीदारांना त्यांच्या रकमेचा परतावा सहा महिन्यांच्या आत मिळण्याचा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाकडून मिळविला. (वार्ताहर)
>शिरूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्याची गरज
शिरूर तालुक्यातील बहुतांश जनतेने अशाच प्रकारे खासगी कंपन्यांमधील ठेव योजनेमध्ये जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतवले आहे. कंपन्यांनी लोकांची गुंतवणूक करताना काही कमिशन एजंटची नियुक्ती करून मध्यस्थीना भरपूर कमिशन दिलेले असल्याने या कमिशन एजंटचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमातून शिरूर व पारनेर तालुक्यातील जनतेने खासगी कंपन्यांमध्ये ठेव योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आज मात्र या कंपन्या गायब झाल्या आहेत, काही कमिशन एजंटसुद्धा फरार झाले आहेत, याची सक्षम पोलीस अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच, ज्या लोकांनी या ठेवी खासगी कंपन्यांकडे गुंतवल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संबधितांच्या विरोधात फिर्याद नोंदवावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.