‘गद्दारी कराल तर याद राखा’
By admin | Published: December 26, 2015 01:50 AM2015-12-26T01:50:21+5:302015-12-26T01:50:21+5:30
कोण काय करतंय हे माहिती होत नाही असे नाही, पक्षात राहून पक्षाशी गद्दारी कराल तर याद राखा, असा दम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज संस्था
सोलापूर : कोण काय करतंय हे माहिती होत नाही असे नाही, पक्षात राहून पक्षाशी गद्दारी कराल तर याद राखा, असा दम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना भरला.
विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी सोलापूरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शहर व जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, काही नगरसेवक, जिल्हा परिषद पदाधिकारी, मनपाचे पदाधिकारी व सदस्यांची त्यांनी बैठक घेतली. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाल्यानेच राज्यातील आघाडीची सत्ता गेली.
तशी चूक यापुढे न होण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहील, असे पवार म्हणाले. विधानपरिषदेत बहुमत आहे ते टिकविण्यासाठी काँग्रेस-राकाँचे सर्व आमदार निवडून येणे गरजेचे असल्याचे सांगत दीपक साळुंखे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सध्या काँग्रेस-राकाँ अडचणीत
- सध्या राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अडचणीत आहेत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे व निवडणूक जिंकणे अत्यंत गरजेचे आहे; त्यामुळे पक्षाचे एकही मत बाहेर जाऊ देऊ नका, असे पवारांनी बजावले.