लक्षात ठेवा, गाठ शिवसेनेशी आहे
By admin | Published: July 11, 2017 03:56 AM2017-07-11T03:56:26+5:302017-07-11T03:56:26+5:30
बेकायदा बांधकामप्रकरणी २००२ मध्ये २० हजाराची लाच घेताना पकडलेले महाशय जेलमध्ये होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भाईंदर : बेकायदा बांधकामप्रकरणी २००२ मध्ये २० हजाराची लाच घेताना पकडलेले महाशय जेलमध्ये होते. निवडणुका जिंकण्यासाठी घाणेरडे प्रकार खपवून घेणार नाही. शिवसेनेत आलेल्या नगरसेविका सुमन कोठारी यांना धमकी दिल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले. जीवाशी खेळण्याचे काम कराल तर गाठ सेनेशी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिला. यावेळी त्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता सडकून टीका केली. शहरातील व्यापरी त्रस्त झाले आहेत. विकासकांकडून ३०० रुपये चौरस फुटाने पैसे घेतले जात आहेत. व्यापाऱ्यांनी एक पैसाही देऊ नये. कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असे शिंदे म्हणाले.
शिवसेनेचा गटनेता व विजयी संकल्प मेळावा भार्इंदर येथे झाला. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विलास जोशी यांनी निवडणुकी संदर्भात मागदर्शन केले. ठाण्याला मंजूर क्लस्टर योजना मीरा भार्इंदरलाही लागू करुन धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवणार असे शिंदे यांनी सांगितले.
मीरा- भार्इंदरचा पाण्याचा प्रश सुटावा, मेट्रो यावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला, आंदोलने केली. ठाण्याचा विकास जसा केला तसाच मीरा- भार्इंदरमध्ये विकासाचा ठाणे पॅटर्न राबवू असे पालकमंत्री म्हणाले.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था करुन टाकली अशी भाजपावर झोड उठवत उध्दव ठाकरे यांच्या आक्रमकतेमुळे कर्जमाफी झाल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. भाजपा आमच्या झाडावर वाढलेली वेल असून केवळ अफवा पसरवण्याचे काम असल्याने नागरिकांनी आता सावध व्हावे. आम्ही केलेली कामे भाजपवाले नेहमीच त्यांनी केली असे सांगतात. आम्ही पाठिंबा काढला तर त्यांची हंडी कोसळेल असे गुलाबराव यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, खासदार राजन विचारे, प्रा. नितीन बानुगडे- पाटील, आमदार प्रताप सरनाईक, हाजी अराफत शेख आदींची भाषणे झाली. आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, शरद पोंक्षे, प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील, माजी महापौर कॅटलीन परेरा व निर्मला सावळे आदी उपस्थित होते.
>‘मराठी मतदारांचे
अर्ज मेहतांनी फाडले’
मतदारयादीत मराठी व मुस्लीम मतदारांनी नावे नोंदवू नका, त्यांची मते मिळणार नाहीत सांगत त्यांचे अर्ज आमदार नरेंद्र मेहतांनी फाडून फेकून दिल्याचा गौप्यस्फोट भाजपात अनेक पदांवर काम केलेले व शिवसेनेत आलेले शैलेश पांडे यांनी केला. अशा मराठी व मुस्लीमद्वेष्ट्यांना निवडणुकीत भार्इंदरच्या खाडीत ढकला असे पांडे म्हणाले.