लक्षात राहिलेले गुरू

By Admin | Published: July 9, 2017 09:31 AM2017-07-09T09:31:59+5:302017-07-09T09:31:59+5:30

दुरूनच टिळक हायस्कुलच्या घंटेचा आवाज ऐकू आला आणि आम्ही धावत सुटलो. सकाळी दहा चाळीसला शाळा भरायची. घंटा झाल्यानंतर जर वर्गात पोहोचलो तर

Remembering guru | लक्षात राहिलेले गुरू

लक्षात राहिलेले गुरू

googlenewsNext
>अभय शरद देवरे/ऑनलाइन लोकमत
दुरूनच टिळक हायस्कुलच्या घंटेचा आवाज ऐकू आला आणि आम्ही धावत सुटलो. सकाळी दहा चाळीसला शाळा भरायची. घंटा झाल्यानंतर जर वर्गात पोहोचलो तर दोन तास वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा होती. ती टाळण्यासाठी आम्ही दोघेतिघे मित्र जीव खाऊन पळत होतो. चूक आमचीच होती. रस्त्यात चाललेला डोंबा-यांचा खेळ बघत बसलो आणि वेळ किती गेला हे कळलेच नाही. आणि आता सुसाटलो होतो. शाळेच्या दारात पोहोचेपर्यंत राष्ट्रगीत सुरू झाले. आम्ही सावधानमध्ये उभे राहणे अपेक्षित होते पण शिक्षेपुढे कसले राष्ट्रगीत आणि कसले देशप्रेम ! पायातल्या स्लीपर्स फट फट वाजवत वर्गात पोहोचलोसुद्धा ! धापा टाकत टाकत म्हंटले, "मे ......मे.....मे आय कम इन सर ?" वर्गात सगळे सावधानमध्ये उभे होते. वर्गशिक्षकांनी डोळ्यांनी दाटावत तिथेच उभे राहायला सांगितले. आता शिक्षा होणार असा विचार करत असताना राष्ट्रगीत संपले आणि प्रार्थना सुरू झाली. आम्ही अपराध्यासारखे बाहेरच उभे आणि संपूर्ण वर्गाचे लक्ष आमच्याकडे !
प्रार्थना संपल्यावर वर्गशिक्षक काही बोलणार तेवढ्यात शिपाई निरोप घेऊन आला की या मुलांना मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. आम्ही अधिकच गर्भगळीत झालो कारण मुख्याध्यापक रा ना कुलकर्णी यांचा दराराच तेवढा होता. गोरा वर्ण आणि संपूर्ण सफेद कपडे असा वेष असल्याने आम्ही मुलांनी त्यांना बगळा असे नाव ठेवले होते. त्यांना आम्हीच काय पण कराड शहरातील कोणीही कधीच रंगीत कपड्यात पाहिले नव्हते. सदैव परीटघडीच्या पांढ-यास्वच्छ कपड्यातच ते दिसायचे. त्यामागचे कारण नंतर मोठे झाल्यावर कधीतरी कळले. ते महाविद्यालयात असताना म्हणे त्याकाळातल्या फ़ॅशन प्रमाणे हिप्पीसारखे केस वाढवून आणि रंगीबेरंगी कपडे घालायचे. त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांना भर वर्गात अपमानित केले होते. ते सहन न होऊन त्यांनी आयुष्यभर पांढरे कपडे घालण्याचा पण केला होता आणि तो शेवटपर्यंत पाळला होता. हा माणूस आयुष्यभर कपडयानीच नव्हे तर तनाने आणि मनानेसुद्धा स्वच्छ राहिला होता. पण स्वभाव अत्यंत  कडक ! 
अशा सनकी स्वभावाच्या कुलकर्णी सरांसमोर आम्ही अधोवदन उभे होतो. "काय रे गंधड्यांनो, तुम्ही काय केलं माहीत आहे काय तुम्हाला ?" आमच्या मुंड्या खालीच ! " बोला, बोला दातखिळी बसली काय ? राष्ट्रगीत सुरू असताना का धावत गेलात ?" "शिक.... शिक्षा होईल म्हणून ...." मी आपले धैर्य गोळा करू  सांगितले. "शिक्षा होईल म्हणून देशाचा अपमान केलात ? देशापेक्षा शिक्षा मोठी वाटते तुम्हाला ? हेच शिकलात का या शाळेत ?" आम्ही काय बोलणार ? देश, राष्ट्रगीत वगैरे शब्दांचे अर्थ हे कळण्याची उमज नव्हतीच त्यावेळी. काहीतरी चुकलंय इतकेच समजत होते. आमच्या माना काही वर येत नव्हत्या. सरांनी वेताची छडी एकाच्या हनुवटीला लावून मान वर केली आणि विचारले, "सांगा काय शिक्षा देऊ तुम्हाला ?" आम्ही गप्पच ! "सांगा, सांगा तुम्ही सांगाल ती शिक्षा देईन." काही क्षण शांततेत गेले आणि मग सरच म्हणाले, "शिक्षा..... शिक्षा तुम्हाला नाही देणार मी आज. कारण चूक तुमची नाहीच आहे. माझी आहे. तुम्हाला मी आजपर्यंत राष्ट्रप्रेम शिकवू शकलो नाही." मी चोरून सरांच्या चेह-याकडे बघितलं तर त्यांचा चेहरा दुःखाने विदीर्ण झालेला होता. समोरच्या लोकमान्य टिळकांच्या आणि पंडित नेहरूंच्या फोटोकडे पहात सर म्हणाले, "यांना चांगले गुरू लाभले म्हणून ते मोठी देशसेवा करू शकले पण तुम्हाला मात्र आमच्यासारखे पोटार्थी शिक्षक मिळाले म्हणून तुम्हाला राष्ट्रगीताचे महत्व नाही समजले. दोष तुमचा नाही पोरांनो, आमचा आहे. आणि मुख्याध्यापक म्हणून माझा जास्त आहे. जा पोरांनो जा..... तुम्हाला कोणतीच शिक्षा मी करणार नाही. शिक्षा मी स्वतःला करून घेणार. आज संपूर्ण दिवस आणि रात्रीसुद्धा मी जेवणार नाही कारण मी चांगले विद्यार्थी घडवू शकलो नाही." "सॉरी....सॉरी सर...सॉरी" या आगळ्यावेगळ्या शिक्षेने आम्ही तिघेही नखशिकांत हादरलो होतो. आणि अशा शिक्षेवर व्यक्त कसे व्हावे हे समजत नव्हते. "नाही नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका मलाच माझी चूक सुधारली पाहिजे. जा वर्गात. शक्य झाले तर पुन्हा असे वागू नका.... जा !" 
त्यादिवशी केवळ कुलकर्णी सरच नव्हे तर आम्ही तिघेही उपाशी राहिलो. 
गुरुचे एखादे विधान, एखादी कृती, एखादा विचार, कसा आयुष्यभर लक्षात राहतो, नाही ! आणि त्यानिमित्ताने गुरु संपूर्ण लक्षात राहतो ! कुलकर्णी सरांचे उपाशी राहणे आजही भळभळत्या जखमेप्रमाणे सतत आठवते. आजही, एखाद्या शाळेसमोरून गाडीने जरी जात असलो आणि राष्ट्रगीत ऐकू आले तर तिथल्या तिथे ब्रेक मारतो, गाडीतून उतरतो आणि भर रस्त्यावर सावधानमध्ये उभा राहतो..... अगदी आजही !

Web Title: Remembering guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.