शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा उपाय नव्हे!

By Admin | Published: March 7, 2017 03:30 AM2017-03-07T03:30:53+5:302017-03-07T03:30:53+5:30

शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर लक्ष केंद्रित करून प्रश्न संपणार नाही.

Removal of farmers is not a solution! | शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा उपाय नव्हे!

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा उपाय नव्हे!

googlenewsNext


डोंबिवली : शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर लक्ष केंद्रित करून प्रश्न संपणार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी शेती, जोडधंदे, उत्पन्नावर प्रक्रिया सुरू केल्या पाहिजेत. शहरांत शिक्षण, रोजगार, समाजविकासाच्या संधी आहेत. तशा ग्रामीण भागात नाही. त्यामुळेच भारतीय समाजव्यवस्थेत विषमतेची दरी तयार झाली आहे. कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा प.पू. श्रीगुरुजी यांच्या स्मरणार्थ संघाच्या जनकल्याण समितीतर्फे दिला जाणारा श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाला. या वेळी काकोडकर बोलत होते.
यंदाचे पुरस्काराचे २२ वे वर्षे आहे. आजवर ६० व्यक्ती व संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी समाजजीवनाची १० क्षेत्रे निश्चित केली असून त्यांची पाच गटांत विभागणी केली आहे. त्यातील धर्म संस्कृती क्षेत्रासाठी पंढरपूरचे ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांना, तर अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे डॉ. एच.आर. नागेंद्र यांना प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर श्रीगुरुजी पुरस्कार स्वागत समिती अध्यक्ष बाळकृष्ण महाराज पाटील, जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर,संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, संघाचे विभाग संघचालक चंद्रकांत कल्लोळकर, संस्थेचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिगंबर पाटील, ह.भ.प. देगलूरकर, पद्मश्री डॉ. नागेंद्र मान्यवर उपस्थित होते.
काकोडकर म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील दरी मिटवण्यासाठी ज्ञानयुगातील शिक्षण, आरोग्य, विकास, तंत्रज्ञान मूलभूत, अशा सर्वसुविधांचा ग्रामीण भागाला लाभ मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. ते पुढे म्हणाले, नाडीशास्त्रात एक उपकरण आता लवकरच बाजारात येणार आहे. हे उपकरण लावल्यानंतर मधुमेह असेल, तर ते सांगू शकेल. तसेच तो कोणत्या स्टेजला आहे, हेही सांगते. आपल्याकडे समग्र विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आधुनिक काळात विज्ञानाने प्रगती केली आहे. पण, मानसिकता गमावली आहे. पाश्चात्त्य लोक मन:शांती मिळावी, म्हणून भारतीय संस्कृतीकडे वळू लागले आहेत. प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी चिंतन, मनन करावे लागते. त्यामागे प्रयोग करावे लागतात. त्यानंतर, या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, हे समजते. ग्रामीण भागात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मधुमेह आणि हृदयरोग त्यांच्या पुढील पिढीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत आहार कसा असावा, हे सांगितले आहे. तसेच डोहाळे जेवणाला महत्त्व दिले आहे. म्हणून, संस्कृतीतील सर्वच गोष्टींवर अंधपणाने विश्वास ठेवू नये. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची जोड घातली, तर जगासाठी एक चांगला शोध लागेल, असेही ते म्हणाले.
देगलूरकर म्हणाले, वारकरी संप्रदायात माझ्यापेक्षा व्यापक असलेल्या व्यक्ती खूप आहेत. पण, कोणाच्या प्रारब्धरेषा कधी उजळतील, हे सांगता येत नाही. हा पुरस्कार स्वीकारण्याइतका मी मोठा नाही. ते स्वीकारण्याचे धाडस मी केले नसते. पण, सुरुवातीला केवळ कार्यक्रमाला बोलवले होते. नंतर मलाच पुरस्कार आहे, असे सांगितले. त्यामुळे फसवून मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. संघाने मला शिस्तबद्ध पद्धतीने विचार करायला शिकवले. माझ्या परंपरेचा हा सन्मान आहे, असे मी समजतो.
डॉ. नागेंद्र म्हणाले, योगासनांमुळे तुमची एकनिष्ठता वाढते. त्याचप्रमाणे योगमार्ग हा तत्त्वांशी समरूप होण्याचा मार्ग आहे. तरुणपिढी ही खूप हुशार आहे. पण, त्यांच्यात चंचलता खूप आहे. ही तरुणपिढी सगळ्या समस्यांचा सामना करू शकते. पण, आधुनिक काळात मधुमेहासारख्या आरोग्यविषयक समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत. एखादे अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला तर आयुष्यभर त्यांना सांभाळावे लागते. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर औषधोपचार नाहीत. पण, पाठीचे दुखणे यासारखे त्रास योगासने केल्याने आठवड्यात पळून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पण, हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही. तर शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात त्यांचा समावेश केला पाहिजे. मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यत चीन प्रथम तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चुकीच्या जीवनपद्धतीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, योगाकडे वळा. माझा हा पुरस्कार योगप्रणालीसाठी दिला, असे मी मानतो, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कामधेनू आरोग्यधामकडे रक्कम सुपूर्द
श्रीगुरुजी पुरस्काराचे स्वरूप शाल,
श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश, असे आहे.
देगलूरकर यांनी आपल्या पुरस्काराच्या रकमेत काही रक्कम घालून ती कामधेनू आरोग्यधामकडे
सुपूर्द केली.

Web Title: Removal of farmers is not a solution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.