कचऱ्याची समस्या होणार दूर
By admin | Published: July 21, 2016 03:01 AM2016-07-21T03:01:16+5:302016-07-21T03:01:16+5:30
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जमा झालेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पात्रात टाकत असल्याचे उघड झाले
नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जमा झालेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पात्रात टाकत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी पाणी दूषित होत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतीने तातडीने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या आता दूर होणार आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसळ, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येतात. या सर्व गावांमधील कचरा जमा करु न तो डम्पिंग ग्राऊंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी हा कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी थेट घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीत टाकत होते. ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड आहे त्या ठिकाणी घंटागाडी जात नसल्याने कर्मचारी वावे येथील ओहळात कचरा टाकत होते. त्यामुळे पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक गावांना हे दूषित पाणी जाणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले होते, त्यामुळे या दूषित पाण्याने रोगराई पसरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गावातील जमा झालेला कचरा गावाबाहेरील एखाद्या खड्ड्यात अथवा गुरचरण जागेत टाकावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. याची दखल घेत सरपंच मोनिका सालोखे आणि सदस्यांनी तातडीने निर्णय घेऊन घंटागाडी जाऊ शकेल अशा ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राऊंड उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ग्रामपंचायतीत फॉगिंग मशीन असून सुद्धा फवारणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र आता फवारणीही करण्यात येणार आहे.