हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:33 AM2024-02-09T10:33:48+5:302024-02-09T12:11:31+5:30
तरीही पोलीस त्यावर काहीच कारवाई करायला तयार नाहीत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे.
मुंबई - महाराष्ट्रात दिवसाढवळ्या हत्या होतायेत, गोळीबार सुरू आहेत. हे अपयश नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आहे. त्यांनी माफियाराज महाराष्ट्रावर लादलं आहे. हा सूड आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे हे अपयश आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अपयश आहेत. ज्या पद्धतीचे त्यांनी हे सरकार जनतेवर लादलेले आहे. त्यामुळे गावागावत रक्ताचे सडे पडतायेत, लूटमार, हत्या वाढली आहे. मुख्यमंत्र्यांना ताबडतोड काढून याठिकाणी सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा, अशी आक्रमक मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊतांनी आक्रमकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस भाजपाचा कार्यक्रम चाय पे चर्चा करतायेत. परंतु महाराष्ट्राच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा कधी करणार?, ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा करतायेत. हत्या होतायेत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अपयशी, अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. तुम्हाला केवळ आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रिपद दिले आहेत. राज्यातील जनता तुमच्याकडे राजीनामा मागतेय. या राज्याच्या गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांवर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे. परंतु महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही हे दुर्दैव आहे. शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर हेसुद्धा नगरसेवक होते. मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांची निर्घृणपणे मुंबई शहरात हत्या झाली आहे. या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा जो नंगानाच पाहायला मिळतोय तो अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते. गेल्या दीड वर्षात रोज हत्येच्या बातम्या येतायेत. पुण्यात हत्या होते, वकील आढाव दाम्पत्याची हत्या झाली. राज्याचे गृहमंत्री अदृश्य आहेत. ते कुठे आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला.