अडथळा आणणारी अतिक्रमणे काढा

By admin | Published: June 9, 2016 12:55 AM2016-06-09T00:55:38+5:302016-06-09T00:55:38+5:30

शहरात अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो़

Remove interrupter encroachments | अडथळा आणणारी अतिक्रमणे काढा

अडथळा आणणारी अतिक्रमणे काढा

Next


पुणे : शहरात अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो़ यासह सर्व अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना वाहतूक सल्लागार समितीच्या सदस्यांनी बुधवारच्या बैठकीत केल्या़ तब्बल ३ वर्षांनंतर वाहतूक सल्लागार समितीची बैठक बुधवारी पोलीस आयुक्तालयात पार पडली. बैठकीमध्ये सल्लागारांनी सुचविलेल्या सूचनांचे पोलीस आयुक्तांनी स्वागत केले असून महत्त्वाच्या सूचनांवर विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबात संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात येईल, असे आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बैठकीत स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी १ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला तर दोन आठवड्यांपूर्वी उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी वाहतूक शाखेची सूत्रे स्वीकारली. पूर्वीच्या काळात काय झाले, यावर चर्चा करण्यापेक्षा यापुढे वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, यावर बोलण्यासाठी ही बैठक आयोजिण्यात आल्याचे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकीला महानगरपालिका आणि आरटीओ कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सल्लागार समितीचे जवळपास सर्वच सदस्य बैठकीस हजर होते.
शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर शाळा आणि महाविद्यालये आहेत. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी परिसरात कोंडी होते. ती सोडविण्यासाठी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयांना त्यांचे शिपाई वाहतूक नियमनासाठी नेमावे, अशी सूचना सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. राहुल पाटील यांनी केली. त्यांच्या सूचनेची नोंद घेण्यात आली. वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवक तयार करण्याची सूचनादेखील या वेळी करण्यात आली.
आॅगस्ट २०१६ मध्ये पुन्हा एकदा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून सुचविण्यात आलेल्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे
पोलीस आयुक्त शुक्ला यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
>कडक कारवाईची मागणी
शहरातील काही परिसरात फुटपाथवर अतिक्रमण असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडावी, असे सांगण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्तकारवाई करण्यात यावी, तसेच पोलिसांकडूनदेखील वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, अशी सूचना सल्लागार सदस्यांनी केली.

Web Title: Remove interrupter encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.