"रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र  

By बाळकृष्ण परब | Updated: March 23, 2025 19:09 IST2025-03-23T19:06:33+5:302025-03-23T19:09:54+5:30

Sambhajiraje Chhatrapati News: स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या एका कथित समाधीविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

"Remove that statue near Chhatrapati Shivaji Maharaja's tomb at Raigad", Sambhajiraje Chhatrapati aggressively wrote a letter to the Chief Minister Devendra Fadnavis | "रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र  

"रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र  

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या एका कथित समाधीविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून बसवण्यात आलेल्या पुतळ्याविरोधात संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले असून, हा पुतळा त्वरित येथून हटवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

याबाबत सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

दरम्यान,भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिकाही संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. 
 

Web Title: "Remove that statue near Chhatrapati Shivaji Maharaja's tomb at Raigad", Sambhajiraje Chhatrapati aggressively wrote a letter to the Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.